उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे आश्वासन
बेंगळूर : लवकरच मल्लाबाद पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले. विधानपरिषदेच्या शून्य प्रहरात भाजपचे सदस्य बी. जी. पाटील यांनी कलबुर्गी मल्लाबाद पाणीपुरवठा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रखडली असून तातडीने निविदा मागवून काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. यावेळी बोलताना पाटबंधारे मंत्री शिवकुमार म्हणाले, बी. जी. पाटील यांची मागणी योग्य आहे. बोम्माई सरकारच्या अर्थसंकल्पात त्यांनी पाटबंधारे खात्याला 22 हजार कोटींचे अनुदान दिले होते. मात्र, निगममध्ये 28 हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली होती. काम केल्यानंतर बिले न भरल्यास अनावश्यक ताण येईल. केंद्र सरकारकडून आम्हला 5,400 कोटी ऊपये मिळालेले नाहीत. त्यामुळे आमच्या अर्थसंकल्पात ते 16 हजार कोटींवर आणण्यात आले आहे. कोलारच्या एत्तीनहोळे प्रकल्पाचीही हीच परिस्थिती आहे. तुमकूरपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत काम थांबविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.









