कणबर्गी येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील स्कीम क्र. 61 मधील काही शेतकरी उच्च न्यायालयात धाव घेतले आहेत. त्या ठिकाणी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. असे असताना बुडाने ही स्कीम राबविण्यासाठी निविदा काढली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बुडाने एकूण 159 एकर 23 गुंठे असलेल्या जमिनीची निविदा काढली आहे. यामधील 25 एकर मालकी असलेले शेतकरी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचबरोबर 20 एकरमध्ये घरे आहेत. तर 15 एकरमधील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची संमती दिली नाही. एकूण 50 एकर 18 गुंठ्याचा वाद सुरू आहे. असे असताना अचानकपणे बुडाने ही योजना राबविण्यासाठी निविदा काढली आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत योजनेबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे.
कणबर्गी येथील एकूण 159 एकर 23 गुंठे जमीन घेण्यासाठी यापूर्वी बुडाने प्रयत्न केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे ही योजना रेंगाळली होती. मात्र आता पुन्हा संपूर्ण जमिनीचीच निविदा काढली आहे. यामुळे शेतकरी त्याला विरोध करणार आहेत. एकूण पाच जणांनी यासाठी निविदा भरली होती. मात्र केवळ दोन जणच पात्र ठरले आहेत. जर ही योजना राबविली तर त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कणबर्गी येथील शेतकऱ्यांना दिला आहे.









