मंगळवारपासून निविदा भरण्यास सुरुवात
20 रोजी निविदापूर्व बैठक
कोल्हापूर
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीस गती आली आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे पोहोचले असून, दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 22 लाख रुपयांच्या कामांची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे.
केशवराव भोसले नाट्यागृहाच्या पहिल्या टप्प्यात 7 कोटी 35 लाख रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये पडझड झालेल्या दगडी भिंतीचे बांधकाम सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 22 लाख आणि तिसऱ्या टप्यातील 20 कोटींच्या कामाची निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिने, खासबाग, मैदानाचे व्यासपीठ कलादालन, व्हरांडा अशी कामे होणार आहेत. गुरुवारी याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. 11 फेब्रुवारी ते 7 मार्चपर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. 10 मार्च रोजी निविदा उघडण्यात येणार असून, 20 फेब्रुवारी रोजी याची निविदा पूर्व बैठक प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या दालनात होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात 15 कोटींची कामे
तिसऱ्या टप्प्याअंतर्गत फर्निचर, सजावटीसह सर्व कामे करण्यात येणार आहेत. ऑगस्टपूर्वी काम पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात 15 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रीन बिल्डींगसह प्रशस्त पार्किंगचा समावेश आहे.








