कोल्हापूर / अवधुत शिंदे :
रणरणत्या उन्हामुळे काईली होणाऱ्या जिवाला गारवा मिळण्यासाठी तसेच डियाड्रेशनपासून बचाव होण्यासाठी नागरिकांची पाऊले आता नारळ पाणी पिण्याकडे वळू लागली आहेत. त्यामुळे शहरात शहाळांना मागणी वाढली आहे. कडक उष्म्यामुळे हैराण झालेल्या कोल्हापुरकरांचा नारळ पाणी पिण्याकडे कल वाढला आहे. सध्या शहरात दिवसाला आठ ट्रक आवक होत असून 10 हजारहून अधिक शहाळांची विक्री होत आहे. मागणी वाढल्याने शहाळांच्या दरातही वाढ झाली आहे. बाजारपेठेत सध्या 70 ते 90 रुपयांपर्यंत शहाळांचे दर आहेत.
कोल्हापूर शहरात कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातून शहाळांची आवक होते. इतरवेळी शहरात दिवसाला सरासरी 5 ते 6 ट्रक आवक होते. मात्र सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने शितपेयांचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे. शितपेयांसह नारळ पाणी पिण्यालाही पसंती दिली जात आहे. नारळ पाणी आरोग्यदायी आहे. नारळ पाण्यामुळे शरीरातील उष्णताही कमी होते व इलेक्ट्रोलाइटस, पोटेशियम, मॅग्नेशियम मिळते यामुळे निर्जलीकरण होण्याचा धोकाही टळतो. यामुळे थंडाव्यासाठी नारळ पाणी उत्तम असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगतात.
कोल्हापूरात सुमारे 30 ते 35 शहाळे विक्रेते आहेत. आठवडयाला सहा ट्रक शहाळयाची आवक होत होती. उन्हामुळे आता 8 ट्रक शहाळ्यांची आवक होत आहे. यावर्षी नारळाच्या दरात वाढ झाल्याने, शहाळ्याच्या दरात ही वाढ झाली आहे. गोडी व चवीला उत्तम असल्याने शहाळ्यांची मागणी वाढली आहे. यामुळे दर 50 ते 60 रूपगे नगावर गेले आहेत. स्थानिक शहाळ्यांचे दर 35 ते 45 रूपये नग आहेत. याचबरोबर बाजापेठेत रेडीमेट नारळपाण्याचे बॉटल बाजारात आले असून 1 लिटर बाटलीची किंमत 90 रुपये असून याचीही मागणी वाढत आहे.
रखरखत्या उन्हात फिरताना डीहायड्रेशन अर्थात निर्जलीकरनाचा धोका सर्वाधिक असतो. जास्तवेळ उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. जर या पाण्याची भरपाई केली नाही, तर निर्जलीकरन होते. शरीरातील पाणी त्वचेमधून वायुरूपाने (बाष्पीभवन) निघून जाते, ज्यामुळे पाण्याची पातळी लवकर कमी होते. परिणामी रक्तातील क्षार अर्थात सोडियम, पोटॅशिअम आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि स्नायूंना क्रॅम्प येऊ शकतात. याकडे दुर्लक्ष केल्यास रक्तदाब कमी होतो व चक्कर येणे, थकवा आणि हृदयावर ताण येऊन जीव जाण्याचा धोका असतो, असे तज्ञांनी सांगितले.
- कोल्हापूरचा पारा 37 पार
गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापुरातील कमाल तपामान 36 ते 38 अंशांच्या घरात आहे. यामुळे दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवत असतो. याशिवाय पुढील आठड्यात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सापेक्ष आर्द्रतेत वाढ होईल. परिणामी उकाडा अधिक तीव्रतेने जाणवे. प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक ते दोन अंश अधिक तापमान जाणवू शकते. यामुळे उष्माघाताचा धोकाही वाढेल.
- सिंगापूरी शहाळ्यांना मागणी
बाजारात पिवळ्या रंगाचे तामिळनाडू येथील सिंगापूरी जातीचे शहाळे आले आहेत. याचे दर 70 रूपांपासून आहेत. शहाळे हे आरोग्यदायी असल्याने याची मागणीही वाढली आहे. थंडीच्या काळात महीन्याला सुमारे एक लाख तर सिझनमध्ये अडीच ते तीन लाख शहाळ्याची विक्री कोल्हापूरात होत आहे.
उन्हात फिरताना शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यावश्यक आहे. भरपूर पाणी प्या, हलके व सैलसर कपडे परिधान करा आणि शक्यतो टोपी किंवा छत्रीचा वापर करा. उन्हात जास्त वेळ राहिल्यास थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, घामामुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होणे आणि उष्णाघात (हीटस्ट्रोक) होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नारळपाणी हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे, कारण ते शरीराला हायड्रेट ठेवते, इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढते आणि थकवा दूर करण्यास मदत करते.
– डॉ. व्यंकटेश पोवार, वैद्यकीय अधिकारी, सीपीआर








