अमेरिकेच्या वृद्धांमधील स्थिती
वाढत्या वयासाठी शरीर कमजोर होऊ लागते आणि आजार होण्याचे प्रमाण वाढू लागते. अशा स्थितीत अनेकदा लोकांना तातडीच्या उपचारांची गरज भासते. परंतु अमेरिकन जर्नल ऑफ मॅनेज्ड केअरमध्ये प्रकाशित एका संशोधनात 22 टक्के वृद्ध वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत खर्च वाचविण्यासाठी रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे नमूद आहे.
अमेरिकेतील वृद्ध हे रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहणे अधिक पसंत करत आहेत. 50-60 वयातील लोक, महिला आणि ज्यांच्याकडे आरोग्य विमा नाही तसेच ज्यांचे वेतन 30 हजार डॉलर्सपेक्षा कमी आहे, ते उपचाराचा अधिक खर्च पाहता अशाप्रकारचा निर्णय घेत आहेत. ज्या लोकांसमोर वैद्यकीय तातडीची स्थिती निर्माण झालेली नाही, ते देखील खर्चाविषयी चिंताग्रस्त राहत असल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे.

कोरोनाचा आर्थिक प्रभाव आणि टेक्सास-फ्लोरिडासह 12 हून अधिक प्रांतांकडून सर्व कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यात न आल्याने लाखो लोक तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी स्वतःच्या खिश्यातील पैसे खर्च करत आहेत. तर काही जण आरोग्य विमा असूनही विम्यांतर्गत प्राप्त तातडीच्या सेवेबद्दल अनभिज्ञ आहेत. ‘नो सरप्राइज ऍक्ट’ देखील लागू आहे. तातडीची सेवा देणारे कुठलेही रुग्णालय रुणाने कुठल्याही अन्य दुसऱया कंपनीकडून विमा घेतले असल्याच्या स्थितीत बिलामध्ये कुठलाच नवा खर्च जोडू शकत नाही.









