अध्याय एकविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, भक्ती, ज्ञान आणि कर्म असे तीन शुद्ध वेदमार्ग मी सांगितले. पण ते समजून आचरण्याऐवजी लोभी माणसे विषयसुखात अडकतात. देह क्षणभंगुर आहे हे लक्षात न घेता संसारातील आणि स्वर्गातील विषयभोगासाठी सकाम कर्मांचा धडाका लावतात आणि काळ आपल्या मागे लागलेला आहे हे विसरून जातात. माणसाला नेमून दिलेले काम त्याने करावे पण जे काम त्याचे नाही ते करण्याच्या फंदात त्याने पडू नये हा साधा सरळ नियम आहे. जे काम आपले नाही ते करायला गेलं तर त्यामागे काहीतरी स्वार्थ दडलेला असतो.
साहजिकच त्या सकाम कर्माचे मिळणारे फळ बंधनकारक ठरते. तेव्हा असे काम करणे हा मोठा अवगुण ठरतो. याउलट नियत कर्म करून मिळणारे फळ देवाला अर्पण केल्यास तो कर्मबंधनातून मुक्त होतो. त्यामुळे नियत कर्म करणे हा आपोआपच मोठा गुण ठरतो. अशा रीतीने कर्माचरण गुण आणि दोष उत्पन्न करते. अज्ञानामुळे सर्व प्राणिमात्रांमध्ये विषयप्रवृत्ती स्वभावसिद्धच असते. अशी विषयवासना नैसर्गिक असल्यामुळे तिची उपरती म्हणजे निवृत्ती करण्याकरिताच श्रुतीने अनेक प्रकारचे गुणदोष सांगितले आहेत. विषयाची बाधा दूर करण्याकरिता एक शुद्ध व एक अशुद्ध, पलीकडचे ते शुभ, अलीकडचे हे अशुभ असे वेदवाणीच्या रूपाने मीच सांगून ठेवले आहे. विषयांच्या निवृत्तीची, वेदरूपाने मीच स्तुती केलेली आहे. मनात किळस उत्पन्न होण्यासाठीच विषयवृत्तीची निंदाही मीच केली आहे.
कर्म करत असतानाच विषयांची निवृत्ती होवो अशी युक्ती मी वेदात सांगितली आहे. तीच तुला सांगतो ऐक. धर्मानुसार कर्मे करत असताना धर्मपालन, व्यवहार आणि शरीरनिर्वाहासाठी कसं वागावं हे सांगतो. यासाठी निष्पाप आणि शुद्ध बुद्धीची गरज आहे आणि तू तसाच आहेस. धर्माचरण करत असताना त्यातून निवृत्त होणे हे अत्यंत शुद्ध होय. प्रवृत्ती म्हणजे प्रपंचासक्ती. प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला सुख मिळणार नाही असा जो विचार आहे, त्याला निवृत्ती म्हणतात. विषयाच्या आसक्तीने जो जो व्यवहार करावा, तो तो अशुद्धच होय आणि परोपकारवृत्तीने जो व्यवहार करावा तो देवाला व मनुष्याला वंद्य होतो. माणसाच्या आचरणात कोणती चूक होते हे पहायचे झाले तर, अदृष्टदाता ईश्वर आहे, हे मोठमोठे पुरुष विसरतात आणि द्रव्यलोभाने नीचांच्या दारोदार हिंडत असतात, ती अमंगल यात्रा होय. ज्याच्या योगाने संसारातून पार जाता येईल, तिचेच नाव पवित्र यात्रा.
म्हणून ज्याला निवृत्तीची आस लागली आहे त्याने आळस सोडून कीर्तनादि श्रवण करावे, तीर्थयात्रा करावी, साधूंची दर्शने घ्यावीत, पूजा करावयासाठी देवालयात जावे. अनाथाचा प्रेतसंस्कार करण्याने अगणित पुण्य लागते. इतकेच नव्हे, तर पावलोपावली तेणेकरून कोटि यज्ञांचे फळ उत्पन्न होते. प्रसिद्ध असे मनु-पराशरादिक शुद्ध कर्मधर्मप्रवर्तक होऊन गेले, त्यांनी नानाप्रकारांनी गुणदोष व शुद्धाशुद्ध सांगून ठेवले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेच ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांच्या शरीरांना मूळ कारण आहेत,
अशा तऱहेने सर्व स्थावरजंगम शरीरांच्या दृष्टीने समान आहेत आणि सर्वांचा आत्मासुद्धा एकच आहे. सर्वांचे देह समान असले तरी वेदाने त्यांची नावे आणि रूपे वेगवेगळी सांगितली आहेत कारण त्यांनी त्या नामरूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरूषार्थांची सिद्धी करून घ्यावी.
ज्याला नाम व रूप नाही, गुण नाही व कर्मही नाही, अशा सम ब्रह्माचे ठिकाणी लोककल्याणाकरिता माझ्या वेदाने नामरूपाचे भेद कल्पून ठेवले आहेत. पृथ्वी आणि आकाश पाहावयास गेले असता दोन्हीही सर्वत्र सारखीच दिसतात परंतु देशांतरी जाण्यास सोपे पडावे म्हणून दशदिशांची कल्पना करून ठेवली आहे. त्याप्रमाणे नाम, रूप आणि वर्णाश्रम, हे माझ्या वेदाने समाच्या जागी जे विषम उत्पन्न करून ठेवले आहे, ते स्वधर्मकर्माच्या सिद्धीसाठीच होय.
क्रमशः







