जपान जगातील सर्वात अजब देश असल्याचे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. जपानमध्ये आता नवाच प्रकार दिसून येत आहे. तेथील लोक आता नातेवाईक भाडेतत्वावर मिळवत आहेत. मुलासाठी आई किंवा वडिलांची उणीव दूर करणे, एकटे राहणाऱ्यासाठी जोडीदाराची गरज इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे.
जपानी लोकांना ही सुविधा अत्यंत उत्तमप्रकारे प्राप्त होत आहे, एकीकडे हा प्रकार उद्योगाचे रुप धारण करतोय. लोकांना विविध नातेवाईकांसाठी कॅटेलॉग देखील उपलब्ध झाला आहे. वृद्ध आईवडिलांच्या देखभालीसाठी सहकारी असो किंवा वृद्ध लोकांना स्वत:च्या तरुण मुलामुलींसारख्या सहाऱ्याची गरज असो लोकांना सर्व पर्याय मिळू लागले आहेत.

2040 पर्यंत जपानमध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये एकच व्यक्ती राहणार आहे आणि तो देखील विवाहाचे सरासरी वय ओलांडलेला असेल. बहुतांश लोकांकडे कुटुंबाच्या नावावर केवळ वृद्ध आईवडिलच असल्याने देशात कौटुंबिक मूल्यांची जपणूक करणे अवघड ठरत चालल्याचे नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
जपान हा सर्वात कमी लोकसंख्या वृद्धी होणारा देश आहे. येथे वृद्धांचे प्रमाण खूपच वाढले आहे. लोकसंख्या असंतुलन निर्माण झाल्याने लोकांना आता गावांमध्ये स्थायिक होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जपानी लोक स्वत:च्या कामाबद्दल अत्यंत जागरुक असतात. अशा स्थितीत त्यांना कुटुंबासाठी वेळ काढणे जमत नाही. याचबरोबर वृद्ध होत चाललेली लोकसंख्या अन् घटणारी संख्या यामुळे लोकांचा परस्परांशी संपर्क कमी झाला आहे. अशा स्थितीत लोक एकटेपणा दूर करण्यासाठी भाड्याने नातेवाईक मिळवत आहेत.
लोक आता काही तासांसाठी मित्र देखील भाड्याने मिळवत आहेत. येथे रोमँटिक साथीदार देखील भाड्याने मिळतो, भाड्याच्या पत्नीलाही आमंत्रित करता येते. संबंधित कंपन्यांकडून लोकांच्या पसंतीची काळजी घेती जाते. भावनात्मक पैलू देखील भाड्याने नातेवाईक उपलब्ध करताना विचारात घेतला जातो.









