गुहागर :
तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे रस्त्यालगत असलेल्या वेदांत ज्वेलरी कंपनीमधील 10 महिलांना सोमवारी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान उलटी व चक्कर येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. शृंगारतळी येथील बेकरीमधून आणलेल्या पेढ्यातून विषबाधा होऊन हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी आत्ता अन्न व औषध प्रशासन तपासणी करणार आहे. उपचारासाठी शृंगारतळीत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गुहागर पोलिसांनी दिली.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलांमध्ये संजना संजय गिरी (30, रामपूर, ता. चिपळूण), प्रतीक्षा समीर मोहिते (28, तळवली), मधुरा महेश घाणेकर (23, पालपेणे), वृषाली विलास पवार (26, तळवली), पूजा प्रकाश मानके (23, मळण), स्वप्नाली सुरज पवार (26, तळवली), सोनाली राजू नाईक (20, शृंगारतळी), विदिशा विजय कदम (23, कोतळूक), प्रिया दीपक मोहिते (39 कोतळूक), निकिता दीपक गमरे (24, पालपेणे) यांचा समावेश आहे.
पालपेणे रस्त्यालगत असलेल्या वेदांत ज्वेलरी या कंपनीत दागिन्यांना खडे लावण्याचे काम करणाऱ्या एका महिलेने श्रावण सोमवार उपवास असल्याने तालुक्यातील शृंगारतळी येथील बेकरीतून पेढ्याचा एक बॉक्स आणला. तिने आणलेले पेढे आपल्याबरोबर काम करणाऱ्या इतर महिलांनाही दिले. मात्र पेढे खाल्ल्यानंतर दहा महिलांना उलटी व चक्कर येण्यास सुऊवात झाली. यामुळे या महिलांना तातडीने शृंगारतळी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
गुहागर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सर्व महिलांचे जबाब नोंदवून घेतले. दहा महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली. या महिलांच्या तक्रारीनुसार त्या पेढ्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासन करणार आहे व त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.








