दहा रुपयांचे नाणे चालणार नाही’ विक्रेते-व्यापाऱ्यांचे उत्तर ऐकून नागरिक हैराण : गोवा, महाराष्ट्रातील व्यापारी-ग्राहकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
दहा रुपयांचे नाणे चालणार नाही, नोट द्या, हे विक्रेत्यांचे आणि व्यापाऱ्यांचे उत्तर ऐकून नागरिक हैराण झाले आहेत. इतरत्र दहा रुपयांचे नाणे आजही चलनात ग्राह्या मानले जात असताना बेळगावमध्ये मात्र हे नाणे का चालत नाही? याचे कोडे सर्वांना पडले आहे. वास्तविक दहा रुपयांच्या नाण्यांवर कोणतीही बंदी नसताना बेळगावमध्ये हे नाणे चालणार नाही, असे का सांगितले जाते, याचे उत्तरही कोणाकडे नाही.
कोणत्याही प्रामुख्याने भाजीविक्रेत्यांना दहा रुपयांचे नाणे दिले की, हे नाणे बेळगावमध्ये चालणार नाही, असे सांगण्यात येते. मात्र त्याचे कारण विव्रेते देऊ शकत नाहीत. महाराष्ट्र व गोव्यातून बेळगावमध्ये खरेदीसाठी अनेक ग्राहक येत आहेत. त्यांना बाजारपेठेत काहीही खरेदी करताना दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अडचणी येत आहेत. महाराष्ट्र, गोवा आणि इतरत्रही दहा रुपयांचे नाणे चलनात आजही वापरले जाते. बेळगाव त्याला अपवाद का? याचेही उत्तर मिळत नाही.
याचबाबत काही महिन्यांपूर्वी ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून जिल्हाधिकाऱ्यांना दहा रुपयांचे नाणे का चालत नाही? याचे स्पष्टीकरण विचारले होते. तेव्हा त्यांनी दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून रद्दबातल झालेले नाही. त्यामुळे ते चालू शकते, असे स्पष्ट करून त्याबाबत आदेशही प्रसिद्ध केला होता.
या वृत्ताचे कात्रण काही व्यापारी, विक्रेते आणि हॉटेल चालकांनी आपल्या काऊंटरच्या दर्शनी भागात लावून ठेवले आहे. तरीसुद्धा विक्रेते दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावूनसुद्धा बेळगावमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही. दहा रुपयांचे नाणे न घेतल्याने बेळगावबरोबरच गोवा आणि महाराष्ट्रातील व्यापारी व ग्राहक यांची गैरसोय होत आहे.








