वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशातील संभल येथील दंगलप्रकरणी पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक मुल्ला अफरोज हा शारिक साता टोळीशी संबंधित आहे. आरोपी मुल्ला अफरोज हा दुबईमध्ये राहणाऱ्या शारिक साता याच्या सतत संपर्कात होता. शारिक साता हा उत्तर प्रदेशचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून तो सध्या दुबईमध्ये आहे. शारिक साता दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करतो. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. संभल हिंसाचारानंतर गुप्तचर संस्थांनी संभल पोलिसांना साताबद्दल माहिती दिली होती.
24 नोव्हेंबर रोजी संभलमध्ये मशिदीचे सर्वेक्षण सुरू असताना हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच दगडफेकीनंतर पोलिसांच्या मोटारसायकली जाळण्यात आल्या. तसेच पोलिसांकडील शस्त्रे लुटण्यात आली होती. याप्रकरणी नखासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हिंसाचार प्रकरणात सपा खासदार झिया उर रहमान बार्क यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे.









