तातडीने पंचनामे करण्याची तलाठ्यांना सूचना : जालगार गल्लीत घराची भिंत कोसळली
बेळगाव : संततधार पावसामुळे शहर आणि तालुक्यातील घरांची पडझड होत आहे. तहसीलदार कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यात आतापर्यंत दहा घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे संबंधित घरांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 18 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत असल्याने चिकोडी भागातील नद्यांना पूर आला आहे. नद्या पात्राबाहेर वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनदेखील अलर्ट झाले आहे. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान जालगार गल्ली येथील रहिवासी प्रल्हाद तुकाराम पाटील यांच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.
खानापुरासह बेळगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. संततधार पावसामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. आतापर्यंत दहा घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला उपलब्ध झाली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करावेत, अशी सूचना तहसीलदारांनी सर्व तलाठ्यांना केली आहे. त्यामुळे तलाठी व त्यांचे सहकारी प्रत्येक गावातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. भाजप सरकारच्या काळात संपूर्ण घर पडून नुकसान झाल्यास संबंधितांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्यात येत होती. त्यानंतर सदर भरपाई अडीच लाख करण्यात आली. आता पूर्णपणे घर कोसळल्यास 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य केले जात आहे. घराचा काही भाग कोसळल्यास टक्केवारीनुसार भरपाईची रक्कम देण्यात येत आहे. घर, जनावरे किंवा मनुष्यहानी झाल्यास अधिकाऱ्यांनी हयगय न करता तातडीने सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पंचनामे करावेत, अशी सूचना यापूर्वीच तलाठ्यांना केली आहे.
सतर्कतेची सूचना…
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व तलाठ्यांना सतर्क राहण्याची सूचना यापूर्वीच करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी घर, जनावरे किंवा इतर प्रकारची दुर्घटना घडल्यास तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला जात आहे. आतापर्यंत तालुक्यातील दहा घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला उपलब्ध झाली आहे.
– सुभाष असोदे, द्वितीय दर्जा तहसीलदार









