बेळगाव : महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून शहरातील मोकाट जनावरांची धरपकड सुरूच ठेवण्यात आली आहे. मंगळवारी विविध ठिकाणी 10 जनावरे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली आहे. सततच्या कारवाईमुळे भविष्यात शहरातील मोकाट जनावरांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. शहरात मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांना मनपाकडून अनेकवेळा सूचना करूनदेखील त्यांच्याकडून अद्यापही जनावरे सोडली जात आहेत. संबंधित जनावर मालकांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. जनावरांचे कळप रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. तसेच मुख्य बाजारपेठेतील कांदा मार्केट आणि रविवारपेठेत जनावरांचे कळप मुक्त संचार करत आहेत.
त्यामुळे याचा नाहक त्रास भाजी विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. सातत्याने सूचना करूनही जनावरे सोडली जात असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मनपाच्या पशुसंगोपन विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून मोकाट जनावरांची धरपकड करण्यात आली आहे. मंगळवारी एसपीएम रोडवर 2, नानावाडी येथे 1, कॉलेज रोडवर 1, चन्नम्मा सर्कल येथे 1, रविवारपेठेत 1 आणि कोतवाल गल्लीत 4 अशी एकूण 10 मोकाट जनावरे पकडण्यात आली आहेत. पकडलेल्या जनावरांची श्रीनगर येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली असल्याचे मनपा पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णावर यांनी सांगितले.









