बेळगाव जिल्हा गुड्स टेम्पोमालक संघटनेची पोलीस आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : जुन्या पी. बी. रोडवरील किल्ला परिसरात असलेल्या टेम्पो स्टँडवर गेल्या 50 वर्षांपासून मालवाहू टेम्पो उभे करून टेम्पोचालक व मालक आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, सदर जागेवर आता टेम्पो लावण्यास पोलीस विरोध करीत आहेत. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना समज देऊन टेम्पोचालक व मालकांना विनाकारण त्रास देऊ नये, अशा मागणीचे निवेदन बुधवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना बेळगाव गुड्स टेम्पोमालक संघटनेच्यावतीने देण्यात आले. गेल्या 50 वर्षांपासून किल्ला तलाव परिसरात गुड्स टेम्पो वाहने उभी करून आमचा व्यवसाय चालत आहे. टेम्पो व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आम्ही आमचा संसार चालवत आलो आहोत.
असे असताना विकासाच्या नावाखाली कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस आम्हाला सदर ठिकाणी टेम्पो लावण्यास मनाई करत आहेत. टेम्पो उभी केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगत आहेत. त्यामुळे आम्हावर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. याकडे आपण लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे अॅड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव गुड्स टेम्पोमालक संघटनेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. यावेळी अॅड. अण्णासाहेब घोरपडे, अॅड. आर. नलवडे, अॅड. राजू कांबळे, अॅड. स्नेहा लाड-घोरपडे, अॅड. कुट्रे, अॅड. मोहन नंदी, अॅड. विभूतीमठ यांच्यासह टेम्पो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









