कराड : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कराड शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी तात्पुरते मार्ग बदल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये हा आदेश काढला असून तो ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ पासून ते ७ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या अधिसूचनेनुसार दत्त चौक, यशवंत हायस्कूल, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक, बालाजी मंदिर, झेंडा चौक ते कृष्णा घाट या मुख्य मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश व पार्किंग बंद राहील. कोल्हापूर नाका बाजूकडून येणारी वाहतूक दत्त चौक, आझाद चौक, सातशहीद चौक, शुक्रवार पेठ, बालाजी मंदिर मार्गे वळविण्यात आली आहे.
कृष्णा नाका बाजूकडून सोमवार पेठ कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतूक जोतिबा मंदिर, कमानी मारुती मंदिर, सोमवार पेठ पाण्याची टाकी, जनकल्याण बँक या मार्गाने जाईल.
मिरवणुकीस अडथळा आल्यास पर्यायी मार्ग म्हणून कर्मवीर पुतळा, पोस्ट ऑफिस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जोतिबा मंदिर हा मार्ग ठेवण्यात आला आहे. पोपटभाई पेट्रोल पंपाकडून दत्त चौकात येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बंदी असून ती वाहने भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाकामार्गे वडूज किंवा विटा बाजूकडे वळवली जातील.
विसर्जनानंतर मूर्ती घेऊन आलेली वाहने नदीपात्रातील वाळवंटातून स्मशानभूमी जोतिबा मंदिर, कृष्णा नाकामार्गे बाहेर जातील.
रुग्णवाहिका, अग्निशमन व पोलीस दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांवर वाहतूक बंदी व बदल लागू राहणार आहेत.
- पार्किंगची सोय
नागरिकांनी आपली वाहने शिवाजी उद्यान, कन्या शाळेसमोरील मैदान, श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट मैदान (दत्त चौक) आणि जनता पे अॅण्ड पार्क, यशवंत हायस्कूल मागील मैदान येथे पार्क करावीत.








