तात्पुरती स्थगिती
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाराणसी येथील ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. 26 जुलै 2023 च्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे कार्य करु नये. तोपर्यंत अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांच्या अपीलावर निर्णय द्यावा. तो निर्णय कसा होईल ते पाहून सर्वेक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी सूचना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील पीठाने केली आहे.
21 जुलैला वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. तेथील पाय धुण्याच्या हौदाचा परिसर वगळात इतर सर्व भागांचे सर्वेक्षण करण्यात यावे, असा हा आदेश होता. त्यावर मुस्लीम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
पुरातत्व विभागाकडून प्रारंभ
जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व विभागाने सर्वेक्षणासाठी सज्जता सुरू केली होती. सोमवारी विभागाचे 30 जणांचे एक दल परिसरात उपस्थित होते. त्याच्याकडून सर्वेक्षणाच्या कामाला प्रारंभही करण्यात आला होता. तथापि, याचवेळी सर्वोच्च न्यायालयात मुस्लीम पक्षकारांनीं सादर केलेल्या अपील याचिकेवर सुनावणी सुरु झाली. न्यायालयाने सर्वेक्षण काही काळासाठी थांबविण्याची सूचना केली होती. मुस्लीम पक्षकारांना जिल्हा न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी काही काळ द्यावा लागणार आहे, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. 26 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वेक्षण स्थगित ठेवावे असा आदेश देण्यात आला. त्यानुसार कृती करण्यात आली.
उच्च न्यायालयालाही दिशानिर्देश
मुस्लीम पक्षकारांच्या अपील याचिकेची सुनावणी त्वरित करावी आणि 26 जुलैच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निर्णय देण्यात यावा, असा दिशानिर्देश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयालाहीं दिला आहे. त्यामुळे लवकर सुनावणी होणार हे स्पष्ट झाले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यानुसार सर्वेक्षण होणार की नाही, हे निर्धारित केले जाणार आहे.









