वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात अवमानजनक विधान केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. या प्रकरणात सादर करण्यात आलेल्या मानहानी अभियोगाची कारवाई पुढे चालविण्यात येऊ नये, असा आदेश न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांनी सोमवारी दिला आहे. ‘एक खुनीही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो, असे विधान राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षरित्या अमित शहा यांच्या विरोधात, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत केले होते, असा आरोप आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवीन झा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार सादर केली होती. गांधी यांनी काँग्रेसच्या एका सभेत हे विधान केले. या विधानामुळे भारतीय जनता पक्षाची मोठीच मानहानी झाली आहे, असे झा यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले होते. कनिष्ठ न्यायालयाने गांधी यांच्या विरोधात अभियोगाच्या कारवाईला प्रारंभ केला होता. आपल्यावरील आरोप रद्द करावेत, अशी मागणी करणारी याचिका गांधी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली होती. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर गांधी यांच्याकडून प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात फिर्यादींना नोटीसा काढल्या असून त्यांचे म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. मात्र, पुढील आदेशापर्यंत गांधी यांच्याविरोधात अभियोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. हा तात्पुरता आदेश आहे.









