वार्ताहर/उचगाव
बेळगाव-बाची मार्गाची झालेली दुर्दशा आणि येत्या गणेशोत्सवामध्ये या पश्चिम भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमुर्त्या आणि घरगुती मुर्त्या आणतेवेळी या रस्त्यावरील खड्ड्यांचा दणका मुर्त्यांना सहन करावा लागणार आणि मुर्त्या दुखावणार की काय, अशा शंका अनेक भाविकांच्या, युवक मंडळांच्या आणि नागरिकांमध्ये चर्चा होत होत होत्या. अशा आशयाचे वृत्तही ‘तरुण भारत’ मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि शासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. तातडीने या मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने सर्व गणेशोत्सव मंडळांच्या आणि भाविकांतून, ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव-बाची मार्गावरील तसेच कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने अनेक गणेशोत्सव युवक मंडळांना या खड्ड्यातून मुर्त्या कशा घेऊन जायच्या, हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. ट्रॅक्टर, टेम्पोच्या साह्याने मुर्त्या घेऊन जात असताना जर त्या दुखावल्या तर त्या पुन्हा करून घेणे कठीण आहे. यासाठी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी या भागातील गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्यानुसार ‘तरुण भारत’ने या रस्त्याच्या संदर्भात तात्पुरती दुरुस्ती करावी, अशा आशयाचे वृत्त शुक्रवार दि. 22 रोजी प्रसिद्ध करून आवाज उठवताच संबंधितांना जाग आली. आणि शुक्रवारी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील खड्डे बुजवणे, मोठ्या खड्ड्यांतून खडी टाकून रोलिंग करणे हे काम हाती घेण्यात आल्याचे चित्र दिसून येत होते.
गणेशोत्सवानंतर रूंदीकरण, डांबरीकरण करण्याची मागणी
या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे पश्चिम भागातील आणि शिनोळी परिसरातील भाविक आणि नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याची गणेशोत्सवानंतर तातडीने रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचेही काम हाती घ्यावे आणि या रस्त्याचे काम कायमस्वरूपी पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.









