ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई महापालिकेतील सहायक अभियंत्याला मारहाण आणि धमकी प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. चार जुलैपर्यंत अटक अथवा कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मुंबईतील वांद्रे येथील ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय मुंबई महापालिकेने अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत पाडले होते. त्या निषेधार्थ अनिल परब आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी सहायक अभियंत्याला मारहाण केली होती. याप्रकरणात अनिल परब यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर चौघांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह सहा जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने चार जुलैपर्यंत अटक अथवा कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.








