उचगाव ग्राम पंचायतीचा पुढाकार : प्रवाशांत समाधान : कायमस्वरुपी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गाची झालेली दुर्दशा आणि या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सातत्याने होणारे अपघात यावर उपाययोजना म्हणून उचगाव ग्रामपंचायत पुढे सरसावली. उचगाव फाटा ते सुळगा या पट्ट्यात असलेले लहान-मोठे खड्डे, खडीमाती टाकून तात्पुरती मलमपट्टी केल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अति पावसामुळे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर सर्वत्र मोठ-मोठे खड्डे पडले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सातत्याने दुर्लक्ष झाले होते. याची दखल घेऊन बुधवारी उचगाव ग्रामपंचायतीतर्फे बेळगुंदी फाटा, तसेच या भागातील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे जेसीबीने भरून खडीकरण करण्यात आले. तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली तरी रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
या ठिकाणाहून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. याविषयी ‘तरुण भारत’मधून अनेकवेळा आवाज उठविला होता. संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याने उचगाव ग्रा.पं.तर्फे हे काम हाती घेतले. रस्त्यावरील खड्ड्यांचे सपाटीकरण करून खडीकरण केले. सुळगा, तुरमुरी, उचगाव या गावालगत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. खड्ड्यांतून वाहने गेल्याने अनेक वाहने नादुऊस्त होत होती. तसेच या ठिकाणी लहान मोठे अपघातही होत होते. परिणामी बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहने चालवणे म्हणजे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.
संपूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. खड्ड्यांमध्ये रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजणे कठीण झालेले होते. पावसामध्ये खड्ड्यांत पाणी भरल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहने चालवणे कठीण जात होते. खड्ड्यांतील पाणी दुचाकीस्वाराच्या अंगावर उडून अनेकवेळा बाचाबाचीचे प्रसंग घडत होते. बेळगाव-वेंगुर्ला हा राजमार्ग असल्याने या रस्त्यावरून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. परंतु संबंधित प्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रामपंचायत विकास अधिकारी शिवाजी मडिवाळ व सदस्य उपस्थित होते.









