निवेदनाची दखल : नागरिकांतून समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील मरगाईनगरकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी असलेल्या नागराज हुरूडे यांच्या घरासमोरील गल्लीतील रस्त्यावर खडीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, या मागणीचे गल्लीतील नागरिकानी ग्रा. पं. ला गेल्या आठ दिवसापूर्वी निवेदन दिले होते.याची त्वरित दखल घेऊन ग्रा.पं. सदस्य जयराम पाटील व तानाजी पाटील यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे तात्पुरते खडीकरण करून रस्ता वाहतुकीस सुरळीत केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गावच्या तलावाला लागून नेताजी गल्लीच्या पाठीमागील सदर गल्लीची आठ-दहा वर्षापूर्वी निर्मिती झाली आहे. सदर गल्लीचा रस्ता काळ्या मातीचा असल्यामुळे पावसाळ्यात या गल्लीतील नागरिकांना घुडघाभर चिखलातून आपापल्या घराकडे जावे लागत होते. तसेच दुचाकी वाहने दुसऱ्यांच्या दारामध्ये पार्क करावी लागत होती. यामुळे पावसाळ्यामध्ये सदर गल्लीतील नागरिकांना अगदी त्रासामध्ये चार महिने काढावे लागत होते. म्हणून या रस्त्याच्या कामाबाबत गेल्या आठ ते दहा दिवसापूर्वी निवेदन दिले होते. गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्यांचे तात्पुरते खडीकरण करून रस्ता वाहतुकीला सुरळीत केल्याने गल्लीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









