धडक दिलेल्या टेम्पो चालकास बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
देशमुखनगर, नागठाणे : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे येथे टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील युवती जागीच ठार झाली तर वडिलांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते साताराकडे जाणाऱ्या मार्गावर काशीळ (ता. सातारा) येथून इब्राहीम हसन शेख (वय 38) हे आपली मुलगी महेक इब्राहीम शेख (वय 12) हिला आपल्या दुचाकीवरून पुणेकडे घेऊन निघाले होते.
नागठाणे (ता. सातारा) येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता पाठीमागून आलेल्या टेम्पो (क्र. एम एच 12 जी टी 9089) चालकाने दुचाकीस (क्र. एम एच 14 एफ क्यू 2763) जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर पाठीमागे बसलेली मुलगी महेक शेख ही जागीच गतप्राण झाली तर इब्राहीम शेख हे गंभीर जखमी झाले.
दोघांनाही तातडीने नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आरोग्य केंद्रातील परिचारिका हिने जखमीस क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचारा दरम्यान इब्राहिम शेख यांचाही मृत्यू झाला. घटनेची नोंद उशीर पर्यंत बोरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
टेम्पो चालकाच्या खिशात आढळला गांजा
धडक दिलेल्या टेम्पो चालकास बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता त्याचे खिश्यामध्ये गांजा आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पो चालक हा गांजाचे सेवन करूनच आला असल्यामुळे गांजाचे नशेमुळेच त्याने समोरील दुचाकीस मागून जोरदार धडक दिली असल्याची माहिती महामार्गावर उपस्थित असलेल्या प्रवासी नागरिकांनी दिली.








