महानगरपालिकेने कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : बेळगावनजीकच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ कचरा टाकण्याचे प्रकार वारंवार सुरू आहेत. महापालिकेने दंडात्मक कारवाई करूनही मंगळवारी एक टेम्पो चालक केळीचा शिल्लक राहिलेला कचरा महामार्गानजीक टाकण्यासाठी आला होता. परंतु शेतकऱ्यांनी संबंधित वाहनचालकाला अडवून याची माहिती महानगरपालिकेला दिली. यामुळे महापालिकेने यापुढे कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.
लेंडी नाला, तसेच सर्व्हिस रस्त्याच्याशेजारी कचऱ्याचे ढीग टाकण्यात येत आहेत. मृत जनावरे, कचरा, प्लास्टिकच्या वस्तू टाकण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बऱ्याचवेळा हा कचरा पावसाच्या पाण्याने वाहून जाऊन नाल्यामध्ये अडकत आहे. यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
कारवाईची घटना ताजी असतानाच मंगळवारी एका टेम्पोतून केळ्यांचा शिल्लक राहिलेला कचरा टाकण्यात येत होता. पावसामुळे शिवारात शेतकऱ्यांची वर्दळ नव्हती. परंतु त्यावेळी शिवारामध्ये दाखल झालेल्या नारायण सावंत यांनी कचरा टाकताना टेम्पो चालकाला पाहिले. त्यांनी संबंधित टेम्पो चालकाला धारेवर धरून त्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली. हे प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









