नागपंचमीची पर्वणी : नाग-वारुळाची होणार पूजा
बेळगाव : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या सोमवारपासून शिवालये भक्तांनी फुलणार आहेत. श्रावणात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर भक्तांची दर्शनासाठी वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे शहर परिसरातील शिवालयांमध्ये गर्दी होणार आहे. 17 ऑगस्टपासून निजश्रावण मासाला प्रारंभ झाला. सोमवारी पहिला श्रावण सोमवार आहे. त्यामुळे दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होणार आहे. श्रावण 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर असणार आहे. यामध्ये 21, 28 ऑगस्ट आणि 4 व 11 सप्टेंबर रोजी श्रावण सोमवार येणार आहेत. या दिवशी शिवालयांमध्ये भक्तांची वर्दळ वाढणार आहे. श्रावण हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो. पहिल्या सोमवारीच नागपंचमीच्या सणाने सुरुवात होणार आहे. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आल्याने नाग, वारुळ आणि शिवालयांमध्ये पूजा-अर्चा होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी भक्तांची वर्दळ पाहायला मिळणार आहे.









