चुन्नी-प्रसादावरून वाद : तरुणांकडून हल्ला, एकाला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शुक्रवारी रात्री प्रसादावरून 35 वर्षीय योगेश सिंह या सेवेकऱ्याची काठ्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये दोन तरुण बेशुद्ध झालेल्या सेवेकऱ्यावर सतत लाठ्यांचा वर्षाव करताना दिसत आहेत. याप्रसंगी जवळच आणखी 3-4 तरुण उभे होते. घटना घडल्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिक लोकांनी एका आरोपीला घटनास्थळी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव अतुल पांडे (30 वर्षे) असे असून तो दक्षिणपुरीचा रहिवासी आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
मृत सेवेकरी योगेश सिंह हा उत्तर प्रदेशातील हरदोई येथील रहिवासी होता. तो गेल्या 14-15 वर्षांपासून कालकाजी मंदिरात सेवेकरी म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना पीसीआर कॉलवरून घटनेची माहिती मिळाली. पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांशी केलेल्या चौकशीत हल्लेखोर कालकाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे स्पष्ट झाले. दर्शनानंतर त्यांनी सेवेकऱ्याकडे चुन्नी आणि प्रसाद मागितला. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर तरुणांनी प्रथम सेवेकऱ्याला लाथा-बुक्क्यांनी आणि नंतर काठ्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात आले.









