पंतप्रधान मोदींनी केले ध्वजारोहण करून मंदिराचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ पावागड
गुजरातमधील पावागड येथे शेकडो वर्षांपूर्वी मंदिराच्या जागी बांधलेला दर्गा दोन्ही समाजांच्या चर्चेनंतर सामोपचाराने तेथून हटविण्यात येऊन त्या स्थानी महाकाली देवीचे मंदिर स्थापन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे शनिवारी ध्वजारोहण करून उद्घाटन केले. हे मंदिर सामाजिक ऐक्मयाचे जितेजागते उदाहरण म्हणून प्रसिद्धीस येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
पावागड हे गाव गुजरातच्या पंचमहाल जिल्हय़ातील आहे. 500 वर्षांपूर्वी येथे त्याहीपूर्वीपासून अस्तित्वात असणाऱया महाकाली मंदिराच्यावर एका दर्ग्याचे बांधकाम करण्यात आले होते. मंदिराचे शिखर उद्ध्वस्त करून त्याजागी दर्गा बांधण्यात आला होता. सुलतान मोहम्मद बेगडा याच्या नेतृत्वात हा मंदिर विध्वंस करण्यात आला होता. या घटनेचे कागदोपत्री पुरावे अस्तित्वात आहेत.
सामोपचाराने दर्गा हटविला
गेली चार दशके या दर्ग्यासंबंधीचा वाद सुरू होता. पावागडमधील हिंदू आणि मुस्लीम संघटनांच्या नेत्यांनी तसेच मान्यवर नागरिकांनी यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी एकत्र बसून चर्चा केली. मंदिराचा विध्वंस करून दर्गा बांधण्यात आलेला असल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असल्याने ही वस्तुस्थिती दोन्ही समाजातील नेत्यांनी मान्य केली. मुस्लीम समाजाच्या नेत्यांनीही दर्गा इतरत्र हलवून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याला मान्यता दिली. त्यानुसार कृती करण्यात आली.
कालीमातेचे भव्य मंदिर
हे कालीमातेचे मंदिर पावागड टेकडीवर एक हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहे. येथे दर्गा बांधल्यानंतरही लक्षावधी हिंदू भाविक दरवषी या मंदिराला भेट देऊन पूजाअर्चा करीत आहेत. आता दर्गा हटविला गेल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन त्याचे पुनर्निर्माणही करण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा अधिक भव्य स्वरुपाचे नवे कालीमातेचे मंदिर उभे करण्यात आले आहे.
उद्घाटनाला असंख्यांची उपस्थिती
शनिवारी या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना असंख्य भाविक येथे उपस्थित होते. हे मंदिर केवळ आध्यात्मिकतेचे केंद्र नाही तर जनतेच्या भावना आणि विश्वास शेकडो वर्षे कसा टिकून राहतो? याचे जिवंत उदाहरण आहे, अशी भलावण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात केली. अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी सध्या एक भव्य राम मंदिर साकारले जात आहे. केदारनाथ मंदिराचीही अशाच प्रकारे पुनर्बांधणी करण्यात आली आहे. आता हे कालीमातेचे मंदिर भाविकांच्या श्रद्धा आणि भावनांचे प्रतीक म्हणून लोकप्रिय होईल. या मंदिराच्या शिखरावर ध्वज स्थापन करणे आवश्यक होते. तथापि, येथे शिखरच नसल्याने ध्वज स्थापन करणे अशक्मय होते. आता लोकांच्या सहभागातून ही त्रुटी दूर झाली आहे. लोकांना त्याचा अधिकार परत मिळाला आहे, ही बाब समाधानाची आणि आनंदाची असल्याचे पंतप्रधान मोदींनी प्रतिपादन केले.
काय आहे इतिहास?
भारतातील अनेक पुरातन मंदिरांप्रमाणे पावागड येथील महाकाली मंदिराची ही कथा आहे. एकेकाळी लक्षावधी भाविकांनी दरवषी गजबजून जाणारे हे मंदिर मुस्लीम आक्रमणामध्ये साधारणतः 500 वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झाले. मंदिराच्या भिंती कायम ठेवल्या गेल्या. तथापि, शिखर पाडवून त्याजागी सदनशाह पीर यांचा दर्गा बांधण्यात आला. तथापि, त्यानंतरही दरवषी येथे सहस्रावधी हिंदू भाविक येऊन पूजाअर्चा करण्याची प्रथा गेली 500 वर्षे सुरू आहे. आता परिसरातील हिंदू-मुस्लिमांनी समझोता करून दर्गा अन्यत्र स्थापित केल्यानंतर मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे गावकरी समाधानी आहेत.









