सातारा :
मंगळवार पेठ (सातारा) येथील काळाराम मंदिर व हटकेश्वर देवस्थान ट्रस्टची 40 एकर जमिनीची बनावट कागदपत्रे शहा भावानी बनवली. ती जमीन दीड कोटी रूपयांत विक्री केली. या विक्री केलेल्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी धवलचंद्र बाळकृष्ण दोशी (वय 76, रा. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र पुरुषोत्तमदास शहा आणि मोहन पुरुषोत्तमदास शहा व मोहनचा मुलगा हर्ष शहा (तिघे रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून रविंद्र शहा, मोहन शहा व हर्ष शहा यांनी संगनमत करून 23 नोव्हेंबर 2024 च्या सभा नोटीसवर तसेच 30 नोव्हेंबर 2024 च्या प्रोसिडिंगवर ट्रस्टमधील इतर विश्वस्तांच्या खोट्या व बनावट सह्या करून बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्त यांची परवानगी मिळवली. त्यानंतर श्री काळाराम मंदिर व हटकेश्वर देवस्थान ट्रस्ट मधील देवस्थानची दरे खुर्द (ता. सातारा) येथील 40 एकर जमीन दीड कोटी रूपयांना विकली. या विकलेल्या रक्कमेचा तिघांनी अपहार केला. या संपूर्ण प्रकाराची माहिती धवलचंद्र दोशी यांनी मिळाली. त्यांनी तिघाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करत आहेत.
या शहा बंधूनी अनेक आर्थिक गैरव्यवहार व पैशांचा अपहार, विविध लोकांकडून देवस्थानचे जमीनीवर साठेखत / भाडेकरार असे बेकायदेशीर व्यवहार केलेले तपासात दिसून येत आहेत. ज्या ज्या लोकांनी या देवस्थानचे जमिनीबाबत असे व्यवहार करून फसवणूक झाली असेल, त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.








