चार दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : सव्वा कोटी रुपये खर्च
वार्ताहर/कणकुंबी
चिखले गावची ग्रामदेवता श्री सातेरी केळबाय देवी मंदिराचा कळसारोहण तसेच प्रभू राम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि पाषाणरुपी देवी देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि नूतन मंदिराचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 6 ते शनिवार दि. 10 में पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. चिखले ग्रामस्थांनी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून गावात भव्य असे मंदिर उभारले आहे. मंदिराचा कळसारोहण, मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. चिखले ग्रामस्थांनी चार दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. 6 मे रोजी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत मूर्ती विसर्जन विधी सायंकाळी 7 ते 10 पर्यंत आंतरराष्ट्रीय इस्कॉन मंदिर गोकुळधाम चिखले यांचा हरे राम हरे कृष्ण हा आध्यात्मिक दिंडी, कीर्तन, भजन व प्रवचन कार्यक्रम आहे.
बुधवार दि. 7 मे रोजी सकाळी पुण्याहवाचन, देवता वंदन, मंटप प्रतिष्ठा, जलाधिवास. सुवासिनींच्या हस्ते जलाधिवास, सायंकाळी भजन, देणगीदार आणि भक्तांचे स्वागत व सत्कार. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. गुरुवार 8 रोजी सकाळी 8 वाजता मंगलाचरण, प्राकार शुद्धी, देवता आवाहन, पूजन व स्नान विधी, होमहवन, तुळस पूजन होईल. त्यानंतर सद्गुरु भाऊ महाराज यांचे आगमन व पाद्यपूजा. त्यांच्याच हस्ते शिखर कळस प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रात्री चिखले गावच्या भगिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम, नंतर शालेय विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम. शुक्रवार 9 रोजी सकाळी मंगलाचरण, मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा, वतनदार तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित पंच यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णाहुती, बलिदान, गाऱ्हाणे, महाआरती व तीर्थप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम. रात्री गोव्याचे गायक मनोज गणपुले बिंबल व कलाकारांचा संगीत भक्तीरंग कार्यक्रम होणार आहे.
गोवा मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
शनिवार दि. 10 मे रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच गोव्याच्या भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलोचना सावंत यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन आहे. सातेरीदेवी गाभाऱ्याचे उद्घाटन उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी तर केळबाई देवी गाभाऱ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, प्रभू राम गाभाऱ्याचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, मडगावचे अमृतलाल परिहार, बसवराज सानिकोप, पुणे उद्योजक प्रकाश गावडे, पुण्याचे उद्योजक किरण शेवाळे, निवृत्त डीआयजी अशोक पाटील, निवृत्त कर्नल विश्वनाथ पाटील, गोव्याचे रमेश नायर, तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. रात्री 11 वाजता ‘संगीत सौभद्र’ नाटकाचे आयोजन केले आहे.









