‘तथ्य शोधन’ समितीचे निरीक्षण : सर्व दोषींवर कारवाई होणार : मुख्यमंत्री
प्रतिनिधी/ पणजी
शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीस प्रामुख्याने देवस्थान समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे निरीक्षण या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नियुक्त ‘तथ्य-शोधन’ समितीने नोंदविले आहे.
संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती स्थापन करण्यात आली होती व त्यांनी गुऊवारी मुख्यमंत्री कार्यालयात अहवाल सादर केला होता. या समितीने घटनास्थळास भेट देऊन दुर्घटनेवेळी तेथे उपस्थित लोक आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा कऊन सदर 100 पानी अहवाल तयार केला आहे. त्यात या दुर्घटनेस प्रामुख्याने देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पंचायत सचिव यांना जबाबदार धरले आहेत. त्याशिवाय तत्कालीन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, जिल्हाधिकारी स्नेहा गिते, तत्कालीन उपअधीक्षक जीवबा दळवी, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, डिचोलीचे निरीक्षक दिनेश गडेकर यांनाही दोषी ठरविण्यात आले आहेत. या समितीत डीआयजी रेंज वर्षा शर्मा, वाहतूक संचालक प्रवीमल अभिषेक, दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांचा समावेश होता.
समितीकडून प्राप्त अहवालावर बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सदर अहवालाचा आता सरकार अभ्यास करणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. चेंगराचेंगरी घडण्यास जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होईल, याची हमीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
दि. 2 मे रोजी शिरगाव येथे श्रीलईराई देवीच्या जत्रोत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 80 भक्त जखमी झाले होते. जत्रोत्सवात धोंडगण, भक्त आणि प्रशासनाकडून जागृती आणि शिस्तीचे पालन होणे आवश्यक असते. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यादृष्टीने सरकार योग्य खबरदारी घईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यावेळी म्हटले होते.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे लईराई देवस्थानाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष यांच्यात सध्या आरोप – प्रत्यारोपांचे द्वय सुरू झाले आहे. माजी अध्यक्ष गणेश गांवकर यांनी या घटनेस विद्यमान अध्यक्ष दीनानाथ गांवकर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता तर प्रत्युत्तरात दीनानाथ गावकर यांनी सदर प्रकरणात गणेश गावकर यांचाच हात असण्याचा संशय व्यक्त केला होता.









