पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडूपर्यंत असलेली वाऱ्याची खंडितता किंवा कमी दाबाचा पट्टा सोमवारी उत्तर अंतर्गत कर्नाटकापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सरकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसाची तीव्रता आता कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवस राज्याचे कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यातील कमाल तापमान साधारणतः 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात वाढ होत असून, राज्याच्या अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याचे चित्र आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची आणि सोसाटय़ाचा वारा वाहण्याची शक्यता आहे. बुधवारी 19 एप्रिलला कोकण-गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. गुरुवारी 20 एप्रिलला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारी 21 एप्रिलला मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ातही हेच सत्र कायम राहणार आहे.
दरम्यान, पुणे आणि आसपासच्या परिसरात सोमवारी ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची नोंद झाली. पुढचे काही दिवसही ढगाळ वातावरण व पाऊस कायम राहणार असून, तापमानातही वाढ होणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने वर्तविले आहे.








