केंद्र सरकारकडून लवकरच नवा नियम येणे शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वातानुकुलित यंत्रणा, अर्थात एसीसंबंधी केंद्र सरकारने नवे नियम केले असून ते लवकरच लागू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय वीज मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी दिली आहे. वातानुकूलन यंत्रणेचे तापमान 20 डिग्री सेंटिग्रेड ते 28 डिग्री सेंटिग्रेड या मर्यादेतच ठेवणे या नियमांच्या अनुसार अनिवार्य आहे.
वीजेचा उपयोग सक्षमतेने करणे आणि वीजेची बचत करणे या दोन उद्देशांसाठी हे नवे धोरण लागू केले जाणार आहे. भारतात वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. तथापि, वीज उत्पादनाचा खर्चही वाढत चालला आहे. त्यामुळे वीज वाचविण्याची आवश्यकता असून याकामी प्रत्येकाने केंद्र सरकारला सहकार्य करावे, अशी सरकारची इच्छा आहे. एसीचे तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअस या मर्यादेत ठेवल्यास मोठ्या प्रमाणात वीज वाचणार आहे, असे प्रतिपादन न•ा यांनी केले.
अन्य देशांमध्येही असा नियम
एसीचे तापमान विशिष्ट मर्यादेत ठेवण्याचा नियम अन्य देशांमध्येही आहे. या देशांमध्ये अनेक प्रगत देशांचाही समावेश आहे. वीजेच्या वाढत्या उत्पादनामुळे प्रदूषणातही भर पडते. हवा प्रदूषणात भर पडल्यास निसर्गचक्र बिघडून मोठी हानी होणार आहे. हे टाळायचे असेल, तर वीजेवर चालणाऱ्या साधनांचा उपयोग शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि आवश्यक तेव्हढाच करणे आवश्यक आहे. म्हणून यासंबंधीचे नवे नियम लागू केले जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय सांगतात नवे नियम…
विविध श्रेणींमधील आणि विविध स्थानी उपयोगात आणल्या जाणाऱ्या एसी यंत्रणांसाठी हे नवे नियम प्रामुख्याने आहेत. आपले निवासस्थान, सदनिका, कार्यालये आणि औद्योगिक केंद्रे येथील एसीचे तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि 28 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असता कामा नये, असे नव्या नियमांच्या नुसार स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
एसी यंत्रणेचा उपयोग
हवेत उष्मा वाढल्यास तापमान कमी करण्यासाठी, तर हवेत थंडी वाढल्यास वातावरण उष्ण करण्यासाठी एसी यंत्रणा उपयोगात आणली जाते. अनेक कंपन्यांनी त्यांच्या एसी यंत्रणेत तापमान 16 डिग्रीपर्यंत खाली आणण्याची सुविधा ठेवलेली असते. तसेच उष्णता वाढविण्यासाठी ते 30 डिग्री किंवा त्याहीपेक्षा अधिक करण्याची सुविधाही दिलेली असते. एसी यंत्रणेचे तापमान मर्यादेपेक्षा कमी केल्यास वीजेचा उपयोग वाढतो. तसेच ते मर्यादेपेक्षा अधिक केल्यासही वीज मोठ्या प्रमाणात खेचली जाते. या दोन्ही बाबींमुळे वीजेचा अपव्यव होतो. त्यामुळे एसी यंत्रणेचे तापमान कोणत्याही परिस्थितीत 20 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस या मर्यादेत ठेवण्याचा आदेश लवकरच काढण्यात येणार आहे.
प्रकृतीसाठीही घातक
एसीचे तापमान अधिक प्रमाणात कमी ठेवणे किंवा ते अधिक जास्त ठेवणे हे माणसाच्या प्रकृतीसाठीही हानीकारक असते, असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अतिथंड कृत्रिम तापमान किंवा अतीउष्ण कृत्रिम तापमान, अशा दोन्ही स्थितींमध्ये माणसाने फार वेळ घालवू नये, असे वैद्यक शास्त्रानुसार स्पष्ट केले जाते. त्यामुळे वीजेची बचत आणि प्रकृतीस्वास्थ्य हे दोन्ही सुनिश्चित करण्यासाठी नवे नियम लागू केले जाणार आहेत, असे प्रतिपादन करण्यात आले.
तापमान मर्यादेचे नियम कशासाठी?
भारतात झपाट्याने मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गांमधील लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे घरांमध्ये एसी यंत्रणा बसवून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. कार्यालयांमध्येही एसी सुविधा असतेच. परिणामी वीजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विशेषत: मार्च ते जून या चार महिन्यांमध्ये एसी यंत्रणांचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढतो. एसी तापमान 20 पेक्षा खाली आणल्यास वीजेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वीज उत्पादनही वाढवावे लागून राष्ट्रीय संपत्तीवर ताण येतो. भारत हा समशीतोष्ण कटिबंधातील देश असल्याने येथे उन्हाळ्याचे दिवस अधिक असतात. अशा स्थितीत वीजेची बचत करणे हे आर्थिकदृष्ट्या आणि शरीरप्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक असल्याने हे नियम विचाराधीन आहेत.
कंपन्यांवरही बंधने येण्याची शक्यता
एसी यंत्रणा उत्पादित करणाऱ्या कंपन्यांनी 20 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त तापमानाची सुविधा असणाऱ्या यंत्रणांचे उत्पादनच करू नये, असे बंधन त्यांच्यावर आणण्यात येण्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. अन्यथा प्रत्येक घर आणि प्रत्येक कार्यालय यांच्यावर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे कंपन्यांवरच हे बंधन घातल्यास ते अधिक प्रभावी ठरेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.









