वृत्तसंस्था / विजयवाडा
आमच्या राज्याची प्राथमिकता तेलगू भाषेला आहे. मात्र, हिंदी ही उपयुक्त भाषा असून आमचे केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राला समर्थन आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांनीही तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राला पाठिंबा दिला होता. त्यापोठोपाठ आता नायडू यांनीही या सूत्राचे समर्थन केल्याने केंद्र सरकारला मोठे समाधान वाटत आहे.
या धोरणाला तामिळनाडू राज्याने विरोध केला आहे. दक्षिणेतील सर्व राज्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणाला आणि त्रिभाषा सूत्राला विरोध करावा, अशी तामिळनाडूचे मुख्यमंत्रीं एम. के. स्टॅलीन यांची भूमिका आहे. तसेच यासाठी त्यांनी दक्षिणेतील राज्यांची मोट बांधण्याचा प्रयत्नही चालविला आहे. तथापि, आंध्र प्रदेश सरकारने आता यासंबंधी स्पष्ट भूमिका घेतल्याने हा स्टॅलिन यांना धक्का मानला जात आहे. तामिळनाडूचे धोरण दोन भाषांचे आहे.
भाषांचा द्वेष अमान्य
कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याचे धोरण आम्हाला मान्य नाही. भाषा हे संवादाचे साधन आहे. भाषेशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आपल्या मातृभाषेतून ज्यांचे शिक्षण झाले आहे, अशी माणसे जगात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असलेली पहावयास मिळतील. त्यामुळे मातृभाषेला आमचे प्राधान्य राहणार आहे. पण आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही. हिंदीही संवादाचेच साधन आहे. हिंदी प्रमाणेच आम्ही जर्मन आणि जपानी भाषांच्या शिक्षणाचीही व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करणार आहोत. अधिक भाषा येणे हे कोणासाठीही लाभदायीच असते. त्यामुळे आमचे धोरण अनेक भाषांना महत्व देण्याचे आहे, असे नायडू यांनी स्पष्ट केले.








