वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलुगू अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे शुक्रवारी रात्री उशिराने हैदराबादमधील रुग्णालयात निधन झाले. मंगलमपल्ली वेंकट राज असे मूळ नाव असलेल्या अभिनेत्याला फिश वेंकट या नावानेच ओळखले जात होते. निधनसमयी ते 53 वर्षांचे होते.वेंकट यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
फिश वेंकट हे गेल्या काही महिन्यांपासून किडनीशी संबंधित गंभीर आजारांनी ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. उपचारादरम्यान त्यांना डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले, परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
वेंकट यांनी दिग्दर्शक दसारी नारायण राव यांच्या ‘समक्का सरक्का’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. खुशी, बनी, शिवम, गब्बर सिंग, डीजे टिल्लू, स्लम डॉग हसबंड आणि कॉफी विथ अ किलर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या होत्या.









