ठेकेदारांच्या मनमानीमुळे सहा महिने पाटण तालुक्यात रॉकेलच नाही
विशाल कदम/ सातारा
सध्या घरोघरी गॅस पोहचलेले आहेत. पूर्वी स्टोव्ह असायचे तेही आता लोप पावले आहेत. केवळ एकाच पाटण तालुक्यात रॉकेलचा पुरवठा केला जात होता तोही ठेकेदाराच्या मनमानीमुळे गेले सहा महिने बंद आहे. तात्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुसत्याच बैठका घेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. ठेकेदार आपल्याच मुद्यावर ठाम राहिला आहे. तर पुरवठा उपजिल्हाधिकारी सेन्हा किसवे-देवकाते यांचेही प्रयत्न थिटे पडले आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यातील जनता सध्या रॉकेल नसल्याने चुली कशा पेटवायच्या, दिवा कसा लावयाचा असा प्रश्न विचारु लागली आहे.
उज्वला योजना येण्यापूर्वीच घरोघरी ग्रामीण भागात गॅस पोहचला आहे. विविध कंपन्यांच्या गॅसच्या गाडय़ा गावापर्यंत सेवा देत आहेत. त्यामुळे जिह्यात पूर्वी रेशन व रॉकेल दुकानावर जे रॉकेल मिळते ते आता फक्त पाटण तालुक्यात मिळते. पाटण तालुका दुर्गम आणि डोंगराळ असल्याने या तालुक्याला रॉकेलची सुविधा आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून रॉकेलचा एक थेंब सुद्धा पाटण तालुक्यात पोहचला नाही. रॉकेलवरच या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबाची गरज असते. पावसाळा असो वा उन्हाळा प्रत्येक दिवशी रॉकेलशिवाय पाटण तालुक्यात चुली पेटत नाहीत. मानसी पूर्वी दीड ते दोन लिटर रॉकेल दिले जात होते. आता तेही मिळत नाही. सहा महिन्यापासून ही परिस्थिती आहे. रॉकेल कधी येणार याबाबत सातत्याने ग्रामीण भागात विचारणा होते. परंतु रॉकेल वितरकाकडूनही आम्हालाच वरुन आलेले नाही त्यामुळे काही सांगता येत नाही अशी उत्तरे दिली जातात. पावसाळय़ात तर चुलीमध्ये शेणकुटावर रॉकेल ओतल्याशिवाय चुल पेटत नाही. आणि सातत लाईट जात असल्याने दिव्यात रॉकेलची गरज असते. रॉकलच्या तुटवडय़ाबाबत पाटण तालुक्यातील ग्रामस्थांनी अनेकदा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु पुरवठा विभागाकडून तात्कालिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ठेकेदारास नोटीसा पाठवून बैठका घेवून सुचना देवून प्रयत्न केले. ठेकेदाराने स्पष्टच शब्दात सांगितले की आम्हाला रॉकेल पुरवठा करण्यास परवडत नाही. एकच टँकर सगळय़ा तालुक्यात कसा फिरवू, चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला होतोय. त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानीमुळे दुसरा ठेकेदार बदलण्यासाठी प्रयत्न पुरवठा विभागाच्या उपजिल्हाधिकारी सेन्हा किसवे-देवकाते यांनी केले. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. हा प्रश्न कसा सुटणार याचेच कोडे लागले आहे.
जिल्हाधिकाऱयांनी मेणबत्ती योजना सुरु करावी
पावसाळय़ात पाटण तालुक्यातील जनतेचे खूप हात होतात. चुल पेटवण्यासाठी रॉकेलचा आधार होता. तेही कार्डवरील रॉकेल सहा महिने मिळाले नाही. चुल पेटवण्यासाठी रॉकेल कोठून आणायचे. पावसाळय़ात आठ आठ दिवस लाईट येत नाही. या काळात रॉकलेल नसल्याने घरोघरी अंधारच. किमान जिल्हाधिकारी साहेब रॉकेल नाही देता आले तरी मेणबत्तीसाठी योजना तरी सुरु करा. पाटण तालुक्यासाठी अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे.








