कोल्हापूर :
कोल्हापूरच्या सीमेवरचा कावळा नाका, शिरोली नाका, वाशी नाका, उत्तरेश्वर नाका, फुलेवाडी नाका बहुतेकांना माहित आहे. प्रत्यक्षात आता तेथे नाका नसला तरीही नाक्याची ओळख झिरपती का होईना पण जिवंत आहे पण कोल्हापुरात वाघ नाका होता हे फारच कमी लोकांना माहित आहे. आजही तो नाका त्याच्या मूळ वास्तू रुपात आहे. पण काळाच्या ओघात आता तिथे वाघ तर शक्य नाहीच. पण वाघ नाका ही वास्तूही आजूबाजूच्या विस्तारात पूर्ण दडून गेली आहे.
कोल्हापूर पूर्वी पूर्वेच्या दिशेला कसेबसे रेल्वे स्टेशन पर्यंतच होते. रेल्वे स्टेशन होण्यापूर्वी शहर व्हीनस कॉर्नरपर्यंत होते. रेल्वे स्टेशनच्या पुढे दगडाच्या खणी होत्या. आत्ताचे एसटी स्टँड तर त्या खणी मुजवून त्या जागेवरच बांधले आहे. त्यामुळे थेट तिथून पुढे टेंबलाई टेकडीपर्यंत आडवा तिडवा पसरलेला माळच होता. एसटी स्टँडच्या पुढे आता शिवाजी पार्क येथे आहे, येथे संस्थांच्या गवताचा साठा होता. संस्थांचे घोडे, हत्ती उंट यांच्यासाठी तो वापरला जात होता. त्यामुळे या परिसरात शहाजी गंज असे म्हटले जात होते. साठा केलेल्या गवताला चुकून आग लागली तर आग भडकून इतर नुकसान व्हायला नको म्हणून गवत साठवण्यासाठी ही गावापासूनची लांब जागा निवडली होती. आणि त्या परिसरात स्टेशन बंगला व वाघ नाका याच दोन दगडी बांधकामाच्या वास्तू होत्या.
आज हा स्टेशन बंगला नाही. पण जेथे आज विक्रम हायस्कूलचा परिसर आहे. तेथे वाघ नाका होता आणि पटणार नाही, तेथे बिबट्या नव्हे वाघ नव्हे तर चक्क चपळ चित्त्यांना ठेवण्यासाठी एक दगडी इमारत होती. या चित्त्यांकडून शिकार करून घेण्याचा साहसी शौक जपणारी मान्यवर मंडळी त्यावेळी कोल्हापुरात होती आणि त्या छंदापाई या इमारतीत चित्ते सुरक्षित ठेवायचे सोय केली होती.
कोल्हापूर संस्थानात राजश्री शाहू छत्रपती यांनी चित्ते पाळण्याचा हा साहसी शौक जपला आणि चित्ते मानवी वस्ती पासून लांब असावेत म्हणून ही सुरक्षित वास्तू बांधली. तेथे दहा–बारा चित्ते व या चित्त्यांना हाताळणारे पंधरा–वीस चित्तेवान होते. ते चित्त्यासारख्या अतिशय उग्र व चपळ जनावरांना जपतात म्हणून चित्तेवान हे पद त्यांना दिले होते. या चित्त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्याकडून काळवीट हरणाची शिकार करून घेतली जात होती. हे चित्ते इतके प्रशिक्षित की गवताळ माळावर हरण काळवीट दिसले की त्या दिशेने धाव घेई आणि काळवीटाचा पाठलाग करून त्याला पकडे . पण त्याचा फरशा न पडता चित्ता आपल्या शिकारी जवळ शांत बसून राहत असे. चित्तेवान लोक त्या चित्त्याला काळवीटापासून लांब करत .आपल्या हाता तोंडाशी आलेली शिकार चित्ते केवळ चित्तेवानाच्या इशाऱ्यावर त्याला तोंड न लावता सोडत असत. अर्थात चित्यांना रोज मांसाहार होताच. पण तो स्वतंत्रपणे त्यांच्या खास त्यांच्यासाठी खास वाटा नाक्यात पोहोचवला जात होता.
कोल्हापुरात शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनीही हा चित्ते पाळण्याचा साहसी शौक जपला. पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत कोल्हापूरच्या दसरा मिरवणुकीत डोळ्यावर पट्टी बांधलेले दोन चित्ते एका जीपवर बसवलेले पाहायला मिळत होते. हळूहळू हा शिकारीचा खेळ कमी होत गेला. चित्तेही एक एक करत संपले. पण चित्त्याला सांभाळणारे प्रशिक्षित करणारे चित्तेवान कोल्हापुरातच राहिले. महाराणा प्रताप चौक परिसरात त्यांची घरे आहेत. चित्ते ठेवण्यासाठी असलेला वाघ नाकाही विक्रम हायस्कूल परिसरात आहे. पण काळाच्या ओघात वाघा नाक्याची ती खास ओळख पूर्णपणे विसरली गेली आहे. पण आपण कोल्हापूरकरांना आपल्या संस्थानात घोडे, हत्ती, उंट याबरोबरच चित्तेही पाळले जात होते हे माहीत असणे गरजेचे आहे.








