कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
कोल्हापूरातील दसरा चौक येथे 20 जानेवारीपासून ‘हॅंडलूम एक्स्पो’ प्रदर्शन सुरु होते. पण रविवारी दुपारी अचानकपणे प्रदर्शनाचा हा मंडप कोसळला. मंडप पडला की पाडला? याबाबत शहरात उलट–सुलट चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर कोल्हापूरात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, अशा तीव्र भावना मंडपातील विविध व्यावसायिकांकडून व्यक्त झाल्या होत्या. अर्थात असा अनुभव यापूर्वी बाहेरील अनेक व्यावसायिकांना आला आहे.
कोल्हापूरकडे बाहेरील व्यावसायिकांकडून पाठ फिरवली जात आहे. बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांनी कोल्हापूरात व्यवसाय करायचा की नाही? असे चित्र बनू लागले आहे. त्यामुळे उद्योग, व्यावसायिकांना होणारा अप्रत्यक्ष त्रास कमी करण्यासाठी कारवाईची गरज आहे.
कोल्हापूरात व्यापार वाढावा, यासाठी राजषीं शाहू महाराजांनी गुजरात, राजस्थान येथील गूळ व सराफ व्यावसायिकांना आमंत्रित करून सुविधाही उपलब्ध दिल्या होत्या. आजही या व्यवसायांतील तिसरी, चौथी पिढी कोल्हापुरात गुण्यागोविंदाने कार्यरत आहे. पण आज येथील चित्र बदलले आहे. बाहेरून येणारा व्यावसायिक, उद्योजक कोल्हापूरात येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती उभारल्या आहेत. याशिवाय जिल्ह्यांतील काही तालुक्यांत औद्योगिक वसाहती विकसित होत आहेत. तरीदेखील, आजही येथे कोणताच मोठा उद्योग उभारलेला नाही. कारण येथील वातावरण याला कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
एम.आय.डी.सी.मध्ये येणाऱ्या कंपन्यांमध्ये एखादा पक्ष, संघटनेमार्फत अशा कंपन्या, उद्योगांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे दबाव आणला जात आहे. अकुशल कामगारांच्या नावाखाली कार्यकर्ते भरण्याचा प्रकार सुरू आहे, अशातच काही उद्योजक, व्यावसायिकांवर खंडणीसाठी दबावही टाकला जात आहे. परिणामी अशा तणावपुर्ण कारणामुळे कोल्हापूरात मोठा उद्योग येण्यास तयार नाही, असे दिसून येत आहे. याबाबत उद्योजक, व्यावसायिक उघडपणे बोलू शकत नाहीत. ज्यांना अनुभव येत आहे, ते व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
आग्रा येथून उद्यमनगर येथे आलेल्या मिठाईवाल्याने खंडणी न दिल्याने त्याला जीव गमवावा लागला आहे. लहान मुलासह त्याचे कुंटूब रस्त्यावर आले आहे. नागपूर येथील नामवंत मिठाई व्यावसायिकाचे शोरूम राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. पण उद्घाटनाच्या पहिल्या आठवड्यातच एका संघटनेकडून त्यांचे ‘मीटर’ सुरू झाले. परिणामी यासंदर्भात कोठेही चर्चा होत नाही. दिल्लीस्थित बिर्याणीचे साखळी रेस्टॉरंट जिल्ह्यात सुरू आहेत. यातील एक रेस्टॉरंट राजारामपुरी येथे नुकतेच सुरू झाले होते. पण एका पोस्टरच्या नावाखाली खंडणीपोटी या रेस्टॉरंटची तोडफोड करण्यात आली. अन् दुसऱ्या दिवशी या व्यावसायिकांने आपले सारे सामान ट्रकमध्ये भरून कोल्हापूरला राम–राम केला. पण जाता–जाता त्यांनी व्यवसाय कोठेही करा, पण कोल्हापूरात नको, असा सल्ला आपल्या सहकाऱ्यांना दिल्याची चर्चा आहे.
कोल्हापूर हे मराठी–हिंदी चित्रपटाचे माहेरघर होते. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूरात झाले आहे. संजय बन्साळी यांचा भव्य दिव्य अशा पद्मावत या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण येथे सुरू होते. त्यावेळी कोल्हापूरातील स्थानिक कलाकारांना मोठा रोजगार मिळाला होता. पण या चित्रिकरणाचा सेट पेटवण्यात आला. हे सर्वांना माहीत होते. त्यानंतर कोल्हापूरात आजअखेर कोणत्याच हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
- मुख्यमंत्र्यांचा इशारा प्रत्यक्षात येणार काय?
नुकतेच उद्योजकांच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोका लावण्याचा इशारा दिला आहे. उद्योजकाबरोबर इतर व्यावसायिकांना त्रास देणाऱ्यांना मोका लावणार काय ? हा प्रश्न सद्यस्थितीत अनुत्तरीत आहे.








