यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही अनेकार्थांनी वेगळीच म्हटली पाहिजे. पुरुष एकेरीत 21 वर्षीय युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझ, तर महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेसिकोव्हा यांनी मिळविलेले जेतेपद हे ऐतिहासिकच होय. खरेतर हा एका नव्या पर्वाचा प्रारंभ आहे, असेच म्हणावे लागेल. कार्लोस अल्कारेझ हे नाव मागच्या दोन ते तीन वर्षांपासून टेनिसच्या क्षितिजावर सातत्याने चमकताना दिसते. याआधी त्याने 2022 मध्ये अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम पटकावत विजयाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर गतवर्षी त्याने टेनिस किंग नोवाक जोकोविचचा फडशा पाडत प्रथमच विम्बल्डनवर नाव कोरण्याची किमया केली. यंदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदापासून थाटात सुरुवात करणाऱ्या कार्लोसने नोवाकला पराभूत करीत आधीचा विजय हा योगायोग नव्हता, हेच दाखवून दिले आहे. कार्लोसने आत्तापर्यंत चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य म्हणजे या सर्वच्या सर्व स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. अंतिम लढतीत तो आत्तापर्यंत एकदाही पराभूत झालेला नाही. यावरून त्याच्यातील वीजिगीषू वृत्तीचेच दर्शन घडते. नोवाक व कार्लोस हेही आत्तापर्यंत सहा वेळा परस्परांना भिडले आहेत. त्यामध्ये दोघांनीही प्रत्येकी तीन लढती जिंकल्या आहेत. या लढायांचा निकाल बरोबरीत सुटला असला, तरी वय, जोष व तोडीस तोड खेळाचा विचार करता पुढचे पर्व हे अल्कारेझचे असू शकते, यात संदेह वाटत नाही. वयाची 22 वर्षे पूर्ण करण्याआधीच दोनदा विम्बल्डन जिंकण्याचा विक्रम बोरिस बेकर व ब्योर्न बोर्गनंतर कुणी केला असेल, तर या नव्या ताऱ्याने. त्यामुळे त्याच्याकडून भविष्यात नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील. विम्बल्डनचे जेतेपद हे माझे स्वप्न होते. वयाच्या 19 व्या वर्षीच एका मुलाखतीत मी हे सांगितले होते. सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन जेतेपद जिंकले असले, तरी हे स्वप्न कायम राहील, असे कार्लोस म्हणतो. यातून त्याची पदकांची भूकच ध्यानी येते. अंतिम सामन्यात त्याने ज्या पद्धतीने खेळ केला, तो अप्रतिमच म्हणावा लागेल. अचूक सर्व्हिस, ताकदवान फटक्यांबरोबरच चतुरस्र पद्धतीचा खेळ त्याने केला. मुख्य म्हणजे डोके शांत ठेवत अत्यंत सकारात्मक पद्धतीने तो कोर्टवर वावरला व त्याचेच फळ त्याला मिळाले, असे म्हणता येईल. जागतिक टेनिसच्या पटलावर आजवर अनेक महान खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. यामध्ये बोर्ग, बेकर, आंद्रे आगासी, पीट साम्प्रास, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविचपर्यंत अनेक खेळाडूंचा समावेश होतो. यातील फेडरर, नदाल व जोकोविच हे समकालीन. यातील फेडरर व नदाल यांचा सत्तासूर्य मावळला. जोकोविच मात्र तळपत राहिला. परंतु, त्याची कारकीर्दही अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येते. फेडररच्या नावावर 20 ग्रँडस्लॅम पदके आहेत. नदालच्या 22, तर जाकोविचच्या 24. टेनिसच्या या त्रिदेवांमध्ये तसा जोकोविच सर्वांत पुढे. आकडेवारीत तो सरस ठरला असला, तरी खेळातील पदलालित्य, सौंदर्य, नजाकत यात सर्वांत सरस म्हणून फेडररचाच उल्लेख होतो. याशिवाय एक खेळाडू व माणूस म्हणूनही फेडरर टेनिसप्रेमींच्या कायम स्मरणात आहे. टेनिसला त्याने अलविदा केला असला, तरी आजही त्याचा चाहता वर्ग सर्वाधिक असणे, यातून त्याचे वलय ध्यानी येते. नदालचा खेळ तसा वेगवान. लाल मातीत त्याच्या खेळाला कायम चार चाँद लागत. तिथे त्याला रोखणे कुणालाच फार कधी शक्य झाले नाही. या दोन ध्रुवांमध्ये जोकोविचही अधूनमधून चमकत राहायचा. आकडेवारीत तो या दोघांना मागे टाकेल, असे तेव्हा कधीही वाटले नव्हते. पण, आज तो अव्वल असणे, ही वस्तुस्थितीच. अर्थात कोरोना लशीवरील त्याची भूमिका वा खेळतानाचा त्रागा या गोष्टी तशा खिलाडूवृत्तीला कधीही साजेशा नव्हत्या. असे असले, तरी त्याचे व त्याच्या खेळातील मोठेपण नाकारता येत नाही. या तिघांच्या अस्तानंतर टेनिसमध्ये कुणाचे राज्य येणार, हा प्रश्न चाहत्यांना पडत असायचा. त्याचे उत्तर आता कार्लोस अल्कारेझच्या ऊपाने मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आज वय, खेळ सर्व काही त्याच्या बाजूने आहे. म्हणूनच अल्कारेझचे हे जेतेपद ही नव्या युगाची नांदी आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. दुसऱ्या बाजूला महिलांमध्ये बार्बोरा क्रेसिकोव्हाने केलेली कामगिरी हीदेखील उल्लेखनीय. इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीवर तिने मिळविलेला विजय हा संस्मरणीयच ठरावा. बार्बोराचा हा विम्बल्डनमधील पहिलाच विजय आहे. कोणत्याही खेळाडूसाठी विम्बल्डनची स्पर्धा ही खास असते. या टेनिसपंढरीत जेतेपदाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येक टेनिसपटू पाहत असतो. 31 व्या मानांकित बार्बोराने ही स्वप्नपूर्ती घडवून आणणे, हे कौतुकास्पद होय. 2021 च्या फ्रेंच ओपनमध्येही तिने अजिंक्यपद मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आत्ताचा विजय सुखावणारा असला, तरी यापुढेही तिला खेळामध्ये सातत्य दाखवून द्यावे लागेल. टेनिसमध्ये मार्गारेट कोर्ट, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, विल्यम्स भगिनी यांनी एक पर्व निर्माण केले. मात्र, मागच्या काही वर्षांत एका विशिष्ट टेनिसपटूस टेनिसवर वर्चस्व दाखविता आलेले नाही. बऱ्याच जणींनी आलटून पालटून विजय नोंदविले आहेत. हे पाहता त्यांच्यात काहीसा सातत्याचा अभाव दिसतो. टेनिस हा क्रीडाप्रकार वैशिष्ट्यापूर्ण व नजाकतदार आहे. या खेळात खेळाडूंचा अक्षरश: कस लागतो. केवळ ताकद असून चालत नाही. तर पदलालित्य, चापल्यही दाखवावे लागते. आजवर अनेक शैलिदार टेनिसपटूंनी हा खेळ समृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यातही अशाच सहजसुंदर खेळाची अपेक्षा या टेनिसपटूंकडून असेल. टेनिसचे कोर्ट असे दणाणत राहो व टेनिसरसिकांचा आनंदही द्विगुणित होत राहो, हीच अपेक्षा.








