वृत्तसंस्था / हैद्राबाद
तेलंगणासारख्या नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असणाऱ्या राज्याची दुर्दसा काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी केली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या राज्यातील नागरकुर्नूळ येथे एका जाहीर सभेत भाषण करताना त्यांनी विरोधकांवर टीकेचे प्रहार केले. या राज्याची सत्ता काँग्रेस आणि बीआरएस या दोन पक्षांच्या हातीच नेहमी राहिलेली आहे. या पक्षांनी राज्याचा विकास करण्याची दूरदृष्टी दाखविली नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी राज्याच्या साधनसंपत्तीचा दुरुपयोग केला. त्यामुळे तेलंगणाची जनता या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच मोठा कौल देईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत या राज्यात विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीत बीआरएसचा दारुण पराभव होऊन काँग्रेसला विजय मिळालेला होता. तर भारतीय जनता पक्षाचे बळही दुपटीपेक्षा अधिक वाढले होते. या राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत.









