दरोड्यादरम्यान गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप : मृतदेह सापडला
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेत गोळीबारात 26 वर्षीय भारतीय विद्यार्थी प्रवीणचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. तेलंगणामधील रंगा रे•ाr जिह्यातील रहिवासी प्रवीण विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे ‘एमएस’चे शिक्षण घेत होता. हैदराबादमधून बी.टेक पूर्ण केल्यानंतर तो 2023 मध्ये अमेरिकेला गेला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतातील त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आहे. प्रवीणच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या शरीरावर गोळीबाराच्या खुणा दिसून आलेल्या आहेत. दरोड्याच्या प्रयत्नात प्रवीणची गोळी झाडून हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. प्रवीणच्या कुटुंबाने अमेरिकन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि भारत सरकारकडून मदत मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.
प्रवीण गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आला होता. यानंतर तो जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेला परतला. आता त्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सध्या कुटुंबाला मृत्यूचे कारण सांगण्यात आलेले नाही. मात्र, प्रवीणची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळेल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळात अमेरिकेत तेलंगणातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही तिसरी घटना आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये तेलंगणातील खम्मम शहरातील एका विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या वर्षी जानेवारीमध्ये हैदराबादमधील एका विद्यार्थ्याचाही अशाचप्रकारे मृत्यू झाला.









