वृत्तसंस्था / पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाची सूत्रे आता त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे देण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बिहारमध्ये या वर्षाच्या नोव्हेंबर महित्यात, अर्थात आणखी 10 महिन्यांनी विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांच्या संबंधी या पक्षाने घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानण्यात येत आहे. मागची 2020 ची विधानसभा निवडणूक तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वात सहा पक्षांच्या महागठबंधनाने लढविली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता दल, तसेच लोकजनशक्ती आणि इतर छोट्या पक्षांच्या युतीचा थोडक्यात विजय झाला होता. यावेळीही याच दोन आघाड्यांमध्ये संघर्ष होईल, अशी अपेक्षा असून निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता आहे.









