इस्रायली रडारची घेणार जागा : 50 लक्ष्यांना ट्रॅक करण्यास सक्षम : 100 किमी अंतरावरून शत्रूला ओळखणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजसमध्ये आता स्वदेशी रडार ‘उत्तम’चा वापर करण्यात येणार आहे. हा रडार एकाचवेळी 50 लक्ष्यांना ट्रॅक करण्यास सक्षम आहे. उत्तम सध्या भारतीय वायुदलात वापरण्यात येणाऱ्या इस्रायली रडारची जागा घेणार आहे. उत्तम रडारची आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे तो 10 किलोमीटर अंतरावरून शत्रूला ओळखू शकणार आहे. याचबरोबर तेजस विमानांमध्ये अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूटचा देखील वापर करण्यात येणार आहे. अंगद जॅमरसारखे काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड एरे (एईएसए) उत्तम रडार आणि अंगद इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूटला स्वदेशी स्वरुपात विकसित करण्यात येत आहे आणि अत्यंत लवकरच एलसीए मार्क-1ए विमानासोबत ते जोडले जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
ईएलटीए 2052 रडारचे स्थान घेणार
भारतीय वायुदलाने 83 एलसीए मार्क-1ए लढाऊ विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील 41 व्या तेजस विमानापासून 83 व्या विमानांमध्ये उत्तम आणि अंगदचा वापर केला जाणार आहे. पहिल्या 40 तेजस लढाऊ विमानांमध्ये इस्रायलच्या ईएलटीए 2052 रडारचा वापर करण्यात येत आहे. भारताचा स्वदेशी उत्तम रडार इस्रायलच्या रडारची जागा घेणार आहे. भारतीय वायुदल 83 एलसीए मार्क 1 सोबत आणखी 97 विमानांची ऑर्डर देणार आहे. या विमानांची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून करण्यात येणार आहे. यातील 31 विमाने भारतीय वायुदलाला मिळाली असून ही सर्व तेजस मार्क-1 प्रकारातील आहेत.
तेजस मार्क-1 ए विमाने काश्मीरमध्ये तैनात
30 जुलै रोजी वायुदलाने जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा वायुतळावर तेजस एमके-1ए विमानांना तैनात केले आहे. वायुदलाचे वैमानिक काश्मीर खोऱ्यात या विमानांसोबत उ•ाणाचा सराव करत असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेमुळे काश्मीर खोरे संवेदनशील क्षेत्र आहे. तेजस एमके-1ए हे बहुउद्देशीय हलके लढाऊ विमान असून ते वायुदलाला काश्मीरमधील वनक्षेत्र अन् पर्वतीय क्षेत्रांवर देखरेख ठेवून प्रसंगी कारवाई करण्याची क्षमता प्राप्त करून देणार आहे. वायुदलाकडे सध्या 31 तेजस विमाने आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये स्वत:च्या लढाऊ विमानांना तैनात करत हिमालयीन क्षेत्रात उ•ाण करण्याचा अनुभव वैमानिकांना मिळवून दिला जात आहे.
तेजसचे वैशिष्ट्या
सध्या वायुदलाच्या ताफ्यात सुखोई-30 एमकेआय, राफेल, मिराज, मिग-29 आणि तेजस ही लढाऊ विमाने सामील आहेत. तेजस स्वत:च्या वैशिष्ट्यांमुळे उर्वरित लढाऊ विमानांमुळे वेगळा ठरतो. तेजस या विमानाच्या निर्मितीकरता 50 सुटे भाग हे भारतातच निर्माण करण्यात आले आहेत. तसेच यात इस्रायलचे ईएल/एम-2052 रडार लावण्यात आला असून यामुळे एकाचवेळी 10 लक्ष्यांना ट्रॅक करत त्यांचा वेध घेतला जाऊ शकतो. तेजस हे विमान केवळ 460 मीटरच्या धावपट्टीवरून उ•ाण करण्याची क्षमता राखून आहे. हे लढाऊ विमान सुखोई, राफेल, मिराज आणि मिगच्या तुलनेत कमी वजनाचे आहे.









