खोऱ्यात वैमानिकांकडून उड्डाणाचा सराव : चीन- पाकिस्तान सीमेमुळे संवेदनशील भाग
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारतीय वायुदलाने जम्मू-काश्मीरच्या अवंतिपोरा वायुतळावर तेजस एमके-1 लढाऊ विमान तैनात केले आहे. वायुदलाचे वैमानिक काश्मीर खोऱ्यात तेजसच्या उड्डाणाचा अनुभव घेत आहेत. शेजारी देश चीन अन् पाकिस्तानची सीमा नजीक असल्याने काश्मीर खोरे हे अत्यंत संवेदनशील आहे. तेजस एमके-1 बहुउद्देशीय हलके लढाऊ विमान असून ते वायुदलाला काश्मीरमधील वन अन् पर्वतीय क्षेत्रांमध्ये मजबुती प्रदान करणार आहे.
भारतीय वायुदलाच्या ताफ्यात सध्या 31 तेजस विमाने आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये स्वत:च्या लढाऊ विमानांना तैनात करत हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये उड्डाण करण्याचा अनुभव मिळावा म्हणून वायुदलाकडून हे पाऊल उचलले जाते.
भारतीय वायुदल तेजसमध्ये अधिक क्षमता जोडण्यात याव्यात यासाठी आग्रही आहे. वायुदलाने यापूर्वच स्वत:च्या दोन स्क्वाड्रन्सना तेजस लढाऊ विमानांच्या ऑपरेशनसाठी मंजुरी दिली आहे. तर 83 मार्क1ए साठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ही सर्व 83 विमाने एक किंवा दोन वर्षात वायुदलाला मिळणार आहेत.
डीआरडीओकडून विकसित करण्यात येणाऱ्या एलसीए मार्क-2 आणि अॅडव्हान्स्ड मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट एएमसीएवर वायुदलाची नजर आहे. ही लढाऊ विमाने पाकिस्तानी आणि चिनी जेएफ-17 लढाऊ विमानाच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहेत. यात हॅमर जोडले गेल्याने हे विमान अधिकच अत्याधुनिक ठरले आहे.
तेजसची गरज का भासली?
मागील 5 दशकांमध्ये 400 हून अधिक मिग-21 विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने भारत सरकार त्यांना स्वत:च्या ताफ्यातून हटवू पाहत आहे. मिग-21 चे स्थान घेण्यास तेजस यशस्वी ठरले आहे. वजन कमी असल्याने हे विमान युद्धनौकांवर सहजपणे लँड आणि टेकऑफ करू शकते. याचबरोबर शस्त्रास्त्र वाहून नेण्याची याची क्षमता मिग-21 पेक्षा दुप्पट आहे. तर राफेलपेक्षा तेजस अधिक वेगवान आहे.
हवाई युद्धाभ्यासासाठी विदेशात
फेब्रुवारी महिन्यात वायुदलाने पहिल्यांदाच तेजस लढाऊ विमानाला हवाई युद्धाभ्यासासाठी विदेशात पाठविले होते. संयुक्त अरब अमिरातमध्ये डेझर्ट फ्लॅग नावाने 27 फेब्रुवारीपासून 17 मार्चपर्यंत युद्धाभ्यास झाला, यात भारताकडून 5 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आणि 2 सी-17 विमानांनी भाग घेतला होता.