सेन्सेक्स 721 अंकांनी वधारला : वित्त, ऊर्जा कंपन्यांचे समभाग नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
गेली चार सत्रे घसरणीत राहिलेल्या भारतीय शेअरबाजाराने सोमवारी जोरदार कमबॅक केले. सेन्सेक्स 700 अंकांवर वधारत बंद झाला असून वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या दमदार कामगिरीचा लाभ बाजाराला झाला आहे.
डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह परतल्याचे दिसून आले. सरतेशेवटी सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 721 अंकांच्या वाढीसह 60,566.42 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 207 अंकांच्या वधारासह 18,014.60 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. सोमवारी गेल्या चार सत्रातील घसरणीला अखेर विराम मिळाला आहे. दिवसभरात पाहता सेन्सेक्सने 59,754 ची नीचांकी तर 60,834 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. निफ्टीने दमदार कामगिरी नोंदवत 18 हजाराची पातळी पार करण्यात यश मिळवलं आहे. सोमवारच्या सत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया व इंडसइंड बँक यांचे समभाग सर्वाधिक वधारासह बंद झाले आहेत. बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, आयटीसी, ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स यांचे समभागही 2 ते 3 टक्के तेजीसह बंद झालेले पाहायला मिळाले. पण दुसरीकडे नेस्ले इंडियाचा समभाग मात्र घसरणीत होता. बँक निफ्टी निर्देशांकानेही सोमवारी दमदार बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. हा निर्देशांक 2 टक्के इतका वधारला होता. ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांकही सुमारे 3 टक्के इतका वाढलेला होता. मिडकॅप निर्देशांक 2.3 टक्के, स्मॉलकॅप निर्देशांक 3.1 टक्के वाढला होता. यांना धातू, रियॅल्टी आणि कमोडिटीजच्या निर्देशांकांनी वधारत उत्तम साथ दिली. एनडीटीव्हीचा समभाग 5 टक्के इतका इंट्रा डे दरम्यान वधारताना दिसला. संस्थापक प्रणॉय रॉय व राधीका रॉय यांनी 27.26 टक्के वाटा अदानी समूहाला विकण्याची घोषणा केली आहे. याचाच परिणाम समभागावर सकारात्मक सोमवारी पहायला मिळाला. तर दुसरीकडे 55 समभाग मात्र 52 आठवडय़ानंतर नव्या उंचीवर पोहचले होते तर 208 समभाग 52 आठवडय़ानंतर नीचांकी पातळीवर आल्याचे दिसून आले.
जागतिक बाजार मात्र सोमवारी तेजीकडे वाटचाल करत होते. अमेरिकेतील बाजारात डोव्ह जोन्स व नॅसडॅक निर्देशांक तेजीसह कार्यरत होते. युरोपियन बाजारात मिश्र कल पाहायला मिळाला. आशियाई बाजारात फक्त हँगसेंग नुकसानीत होता तर निक्की, कोस्पी, सेट कम्पोझीट, शांघाई कम्पोझीट निर्देशांक मात्र तेजीसह कार्यरत होते.









