अनेकवेळा सूचना करूनदेखील दुर्लक्ष : दिवसभर कार्यालयात अंधार, नागरिकांची मात्र गैरसोय
बेळगाव : वीज बिल थकीत असल्याने शुक्रवारी बेळगाव तहसीलदार कार्यालयाचे कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे दिवसभर कार्यालयात अंधार होता. अनेकवेळा बिल भरण्याची सूचना करूनदेखील वेळेत बिल न भरल्याने अखेर हेस्कॉमकडून कनेक्शन तोडण्यात आले. सरकारी कार्यालयाने बिल न भरल्याने कनेक्शन तोडण्याची वेळ पुन्हा एकदा हेस्कॉमवर आली आहे. हेस्कॉमची लाखो रुपयांची थकबाकी असल्याने दररोज तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळेच हेस्कॉम एमडीने काही दिवसांपूर्वीच कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले होते. शहरातील महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, शिक्षण विभाग, तहसीलदार कार्यालय, आरोग्य विभाग यासह विविध कार्यालयातील लाखो रुपयांचे वीज बिल थकीत आहे. हेस्कॉमकडून अनेकवेळा सूचना करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर कनेक्शन तोडण्यात येत आहे.
मुदत देऊनदेखील दुर्लक्ष
शुक्रवारी शहरातील तहसीलदार कार्यालयाचे कनेक्शन तोडण्यात आले. तहसीलदार कार्यालयाच्या नावाने एकूण 5 मीटर असून यांचे वीज बिल थकीत आहे. बिल भरण्यासाठी मुदत देऊनदेखील अधिकाऱ्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा तहसीलदार कार्यालयाचे कनेक्शन तोडण्यात आले आहे.
नागरिकांचे हेलपाटे
शुक्रवारी सकाळी हेस्कॉमने अचानक कनेक्शन तोडल्याने दिवसभर कार्यालय अंधारात होते. कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना सर्व्हर नसल्याचे कारण देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात वीज कनेक्शन नसल्यामुळे काम पूर्णपणे ठप्प होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच कोणत्या मीटरचे भाडे कोणत्या विभागाने भरायचे यासाठीही वारंवार वादावादी होत असल्याचे समोर आले आहेत.









