सरकारने आदेश देऊनही दुर्लक्ष : शेतकऱ्यांतून नाराजी
बेळगाव : बळ्ळारी नाला परिसरातील नुकसानग्रस्त पिकांचा सर्व्हे करण्याबरोबरच बळ्ळारी नाल्याची खोदाई करण्याबाबतही अहवाल तयार करा, असा आदेश तहसीलदारांना देण्यात आला आहे. मात्र, अद्याप तहसीलदारांनी याबाबत कोणतीच पावले उचललेली नाहीत. यामुळे यावर्षी तरी बळ्ळारी नाल्याची खोदाई होणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बळळारी नाला हा शेतकऱ्यांना वरदान ठरण्याऐवजी शापच ठरला आहे. दरवर्षी या परिसरातील पिके वाया जात आहेत. बळ्ळारी नाला तसेच शहरातील लेंडी नाल्याच्या परिसरातील पुरामुळे पिके खराब होत आहेत. या दोन्ही नाल्यांची खोदाई करणे महत्त्वाचे आहे. याबाबत शहर शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडेच पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडूनच याबाबत पत्र आले आहे. महापालिका, जिल्हाधिकारी यांनादेखील पत्रे आली आहेत. तेव्हा तातडीने तहसीलदारांना सर्व्हे करण्याची सूचना महापालिकेने केली आहे. मात्र, तहसीलदार अजूनही याकडे फिरकले नाहीत. पिकांचे तर नुकसान झालेच आहे, मात्र पुढील वर्षी नुकसान टाळायचे असेल तर या दोन्ही नाल्यांची खोदाई करणे गरजेचे आहे. आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे केवळ 2 ते 3 महिनेच खोदाई करण्यासाठी अवधी आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून तहसीलदारांनी लवकरात लवकर सर्व्हे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.









