मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची मागणी
@ वृत्तसंस्था / भोपाळ
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना प्रदान करण्यात आलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार मागे घेण्याची मागणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. सेटलवाड यांना अलिकडेच गुजरात पोलिसांनी 2002 च्या दंगलीप्रकरणात निर्दोष लोकांना गोवण्यासाठी पुरावे रचल्याप्रकरणी अटक केली आहे. 2007 मध्ये सेटलवाड यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्यासाठी सेटलवाड यांना हा पुरस्कार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी पाहता सेटलवाड यांच्यासारख्या संशयास्पद किंवा अटक करण्यात आलेल्या लोकांकडून हा पुरस्कार काढून घेण्यात यावा असे मिश्रा म्हणाले.
सेटलवाड यांना गुजरात एटीएसने शनिवारी मुंबईतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे नेत गुन्हे तपास शाखेच्या स्वाधीन केले होते. अहमदाबाद येथील न्यायालयाने 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी निर्दोष लोकांना गोवण्यासाठी पुरावे रचल्याच्या आरोपाप्रकरणी सेटलवाड यांना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.









