वृत्तसंस्था / पाटना
बिहारने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याची रणजी संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. बुधवारपासून रणजी करंडक स्पर्धेचा हंगाम सुरू होत असून पहिल्या दोन सामन्यासाठी सूर्यवंशीला उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व सकिबुल गनीकडे सोपविण्यात आले आहे.
बिहारची रणजी करंडकातील प्लेट लीगमधील पहिली लढत अरुणाचल प्रदेशविरुद्धची लढत मोईन उल हक स्टेडियमवर 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल. बिहार क्रिकेट संघटनेने रविवारी उशिरा संघाची घोषणा केली. मागील मोसमात बिहारला एकही विजय नोंदवता आला नव्हता. त्यामुळे त्यांची पदावनती झाल्याने यावर्षी त्यांना प्लेट विभागात खेळावे लागणार आहे.
सूर्यवंशीने 12 व्या वर्षी 2023-24 या मोसमात रणजी पदार्पण केले होते. नंतर तो आयपीएलमध्ये करार मिळविणारा सर्वात तरुण (13 वर्षे) क्रिकेटपटू बनला होता. याशिवाय इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यू-19 संघाचा तो नियमित सदस्यही बनला आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला यावर्षी झालेल्या मोसमाच्या आधी खरेदी केले होते. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने राजस्थानसाठी 35 चेंडूत शतक नोंदवण्याचा टी-20 मध्ये शतक नोंदवणारा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. आयपीएलमध्ये त्याने नोंदवलेले शतक दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक ठरले. बिहारतर्फे तो या मोसमात पूर्ण खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण पुढील वर्षी झिम्बाब्वे व नामिबिया येथे होणाऱ्या यू-19 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला राष्ट्रीय संघात घेतले जाण्याची शक्यता आहे.
बिहार रणजी संघ : पीयूष कुमार सिंग, भास्कर दुबे, सकीबुल गनी, वैभव सूर्यवंशी, अर्णव किशोर, आयुष लोहरुके, बिपीन सौरभ, अमोद यादव, नवाज खान, सकीब हुसेन, राघवेंद्र प्रताप सिंग, सचिन कुमार सिंग, हिमान्शू सिंग, खालीद अलम, सचिन कुमार.









