अमेरिकेने व्हिसा शुल्क वाढविल्याने कॅनडा सज्ज
वृत्तसंस्था / ओटावा
अमेरिकेने एच वन बी व्हिसा शुल्क वाढविल्याने कामासाठी अमेरिकेत जाणाऱ्या बुद्धीवंतांची संख्या रोडावणार आहे. ही संधी घेऊन अशा प्रज्ञावंतांना संधी देण्याची योजना कॅनडाने सज्ज केली आहे. त्यामुळे अमेरिकेत जाऊ न शकणाऱ्या भारतीय तंत्रवैज्ञानिकांना आता कॅनडाचे दरवाजे मोकळे होण्याची शक्यता आहे.
कॅनडातील अनेक उद्योगांनी या संबंधात कॅनडा सरकारकडे मागणी केली आहे. अमेरिकेत जाऊ न शकणाऱ्या तंत्रज्ञानी लोकांना कॅनडाने प्रवेश द्यावा. याचा लाभ कॅनडाच्या उद्योगांच्या विस्तारासाठी होऊ शकतो. सध्या माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञाचा बोलबाला आहे. भारत असेच इतर देशांमधून कॅनडात या संबंधातील तंत्रज्ञ येऊ शकतात. कॅनडाने तशी संधी त्यांना द्यावी. कॅनडाने अमेरिकेच्या एच वन बी व्हिसासारखी योजना येथे आणावी. मात्र, प्रवेश फी कमी ठेवावी. यामुळे टॅलेंटचा ओघ कॅनडाकडे वाहू लागण्याची शक्यता आहे, असे या देशातील अनेक उद्योगपतींचे म्हणणे आहे. कॅनडा सरकारने अशी योजना आणल्यास भारताचा तिचा सर्वाधिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कॅनडासाठी दैवी संधी
अमेरिकेने एच वन बी व्हिसाचे शुल्क प्रचंड प्रमाणात वाढविणे, ही कॅनडासाठी दैवी संधी आहे. ती साधण्यात यावी, असे विधान कॅनडातील स्थलांतरितांचे वकील इव्हान ग्रीन यांनी पेले आहे. तर कॅनडातील ‘बिल्ड कॅनडा’ या बिगर नफा काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनेही अशीच भावना व्यक्त केली आहे. अमेरिकेप्रमाणे कॅनडातही जागतिक गुणवत्तेच्या प्रयोगशाळा आणि संशोधन पेंद्रे आहेत. अमेरिकेचा आणि कॅनडाचा समयविभाग एकच आहे. तसेच अमेरिकेशी कॅनडा जोडून असल्याने आज एच वन बी व्हिसावर अमेरिकेत काम करणारे जे लोक आहेत, त्यांना कॅनडात येणे अधिक सोयीचे आहे, असे त्यांचे मत आहे.
ब्रिटनचीही योजना
ब्रिटननेही कॅनडाप्रमाणेच तंत्रज्ञांना आपल्याकडे आकर्षित करण्याची योजना आणण्याचा विचार चालविला आहे. ब्रिटनलाही मोठ्या प्रमाणात तंत्रवैज्ञानिकांची आवश्यकता आहे. या देशातही जागतिक गुणवत्तेच्या संशोधन संस्था असून उद्योगही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पुढच्या काळात ब्रिटनमध्येही भारतीयांना आतापेक्षा अधिक संधी मिळू शकते, असे तेथील उद्योगपतींचे मत आहे









