विरोधी पक्षनेते युरी आलेमावकडून स्वागत : आंदोलक रहिवाशांना श्रेय
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
कुंकळ्ळीकरांच्या भावनांचा आदर करण्यास माझे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहील. या पार्श्वभूमीवर काकणामड्डी येथील डोंगरकापणीला दिलेली तांत्रिक मंजुरी रद्द केल्याबद्दल मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांचे आभार मानतो. नैसर्गिक जलस्रोत पुढील पिढय़ांसाठी सांभाळून ठेवणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
नगरनियोजन खात्याने काकणामड्डी येथील डोंगरकापणीला दिलेली मंजुरी मागे घेण्याचा आदेश जारी केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी सदर आदेशाचे श्रेय हे सदर बेकायदेशीर डोंगरकापणीविरुद्ध तक्रारी दाखल केलेल्या आणि सदर जागेवर आंदोलन केलेल्या कुंकळ्ळीच्या रहिवाशांना दिले आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात तसेच गुरुवारी संपलेल्या तिसऱया अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता. काकणामड्डी येथे चालू असलेले काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे या माझ्या दाव्याच्या समर्थनार्थ मी विविध कागदपत्रेही सरकारला सादर केली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
चुकीचा आराखडा सादर करून बेकायदा डोंगरकापणी करण्यात आली. डोंगरकापणी करताना कंत्राटदाराने नगरनियोजन कायद्याच्या कलम ‘17-अ’चे उल्लंघन केले. जवळपास 30 मीटर लांबीची व 10 मीटर रुंदीची अंतर्गत रस्त्याच्या विकासासाठी उतार असलेली जमीन कापण्यात आली. या उघड उल्लंघनामुळे डोंगराचा नाश झाला, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले आहे. कुंकळ्ळीकरांच्या समस्या सोडविण्यास मी सर्वोच्च प्राधान्य देईन. मला आशा आहे की, विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार सरकार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीर कारखान्यांविरुद्ध लवकरच कारवाई करेल तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य महामार्ग-8 ची अधिसूचना रद्द करेल, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.









