उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये योगी आदित्यनाथ यांचे साहस आणि परिवर्तनाची कहाणी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. हा चित्रपट एका योगीची कहाणी असून जो भ्रष्टाचार अन् माफियाराज विरोधात लढतो. उत्तरप्रदेशच्या अस्थिर राजकारणात कशाप्रकारे एक योगी व्यवस्था बदलण्यासाठी समोर येतो हे यात दाखविण्यात आले आहे. अभिनेता अनंत विजय जोशीने ‘योगी’ ही व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली आहे. त्याचा अभिनय संयम अन् उत्साहाचे मिश्रण असून तो प्रेक्षकांना प्रभावित करणारा आहे. हा चित्रपट 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.
रितू मेंगी निर्मित आणि रवींद्र गौतम दिग्दर्शित, हा चित्रपट योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकावर बेतलेला आहे. या चित्रपटात परेश रावल, दिनेशलाल यादव ‘निरहुआ’, अजय मेंगी, राजेश खट्टर, पवन मल्होत्रा आणि गरिमा विक्रांत सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दिलीप बच्चन झा आणि प्रियांक दुबे यांच्या धारदार पटकथेचे आणि मीत ब्रदर्सच्या मनाला भिडणाऱ्या संगीताचे पाठबळ चित्रपटाला लाभले आहे. हा चित्रपट अशा माणसाच्या अकथित प्रवासाची पहिली झलक दाखवतो, ज्याने सर्व अडचणींना तोंड देत माफियाराजचा कणा मोडला. आम्हाला मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून हे सिद्ध होते की, लोक धाडसी, उद्देशपूर्ण कथनासाठी तयार आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्या रितू मेंगी म्हणाल्या.









