नाराज नेत्यांना कमलनाथ यांचा सल्ला : भाजपकडून टीकास्त्र
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यावर बंडखोरी अन् विरोधाचे सूर तीव्र स्वरुपात उमटू लागले आहेत. भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झालेले आमदार वीरेंद्र रघुवंशी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने मोठा वाद उभा ठाकला आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेत पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते रघुवंशी यांच्या समर्थकांना कमलनाथ यांनी जाऊन दिग्विजय सिंह आणि जयवर्धन सिंह यांचे कपडे फाडा असे सुनावल्याचे एका व्हिडिओत दिसून आले आहे.
रघुवंशी यांना शिवपुरी मतदारसंघाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी कमलनाथ यांची भेट घेत केली. यावेळी कमलनाथ आणि रघुवंशी यांच्या समर्थकांमधील संभाषण कुणीतरी रेकॉर्ड केले, जे आता व्हायरल होत आहे. भाजप नेते या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पोस्ट करत आहेत.
मिस अंडरस्टँडिंग झालीय
जारी झालेल्या व्हिडिओत कमलनाथ हे तिकीटवाटपावेळी मिसअंडरस्टँडिंग झाल्याचे रघुवंशी यांच्या समर्थकांना उद्देशून सांगत असल्याचे दिसून येते. रघुवंशी यांचा काँग्रेस प्रवेश मी घडवून आणला आहे. के.पी. सिंह यांना शिवपुरीची उमेदवारी का देण्यात आली हेच मला समजत नाही. शिवपुरी मतदारसंघाबद्दल दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांच्याशी बोलणार आहे. विरेंद्र रघुवंशी यांच्याबद्दल मला जेवढे ममत्त्व आहे, तेवढे तुम्हाला देखील नसेल. त्यामुळे मला समजाविण्याऐवजी जाऊन दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा असे कमलनाथ हे रघुवंशी यांच्या समर्थकांना सांगत असल्याचे व्हिडिओत दिसून येते.
भाजपकडून कमलनाथ लक्ष्य
काँग्रेस नेते कमलनाथ आता पक्षातील नेत्यांचे कपडे फाडविण्यापर्यंत पोहोचले आहेत. पूर्ण काँग्रेसमध्ये दोन गट पडले असताना हे होणे स्वाभाविकच आहे. कमलनाथ यांचा हा व्हिडिओ पाहून दिग्विजय सिंह आणि त्यांच्या सुपुत्राला त्रास निश्चितच झाला असेल तसेच ते राजकीय सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत. आता कोण कुणाचे कपडे फाडतो हे पाहणे रंजक ठरणार असल्याचे उद्गार मध्यप्रदेशातील भाजप नेते आशीष अग्रवाल यांनी काढले आहेत.
कमलनाथ यांचे स्पष्टीकरण
माझे आणि दिग्विजय सिंह यांच्यात प्रेमाचे नाते आहेत, याचमुळे मी जे चेष्टेच्या सुरात बोललो, त्याबद्दल वाईट मानून घेऊ नये असे स्पष्टीकरण कमलनाथ यांनी व्हायरल व्हिडिओप्रकरणी दिले आहे. कोलारस मतदारसंघाचे भाजप आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी मागील महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याचमुळे रघुवंशी यांना कोलारस मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळेल असे मानले जात होते. परंतु या मतदारसंघात काँग्रेसने बैजनाथ यादव यांना उमेदवारी दिली आहे.









